पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशभरातून सर्व कार्यकर्ते गांधीजींचा संदेश ऐकण्यासाठी एकत्र जमले होते. वसंतदादा आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत आले होतेच. ब्रिटिशांना 'चले जाव'चा असा अंतिम इशारा गांधीजी देणार होते. पण ब्रिटिश सरकारही इरेला पेटले होते. त्यांनी गांधींसह पं. नेहरू, सरदार पटेल आदी नेत्यांना पकडून तुरुंगात डांबले.
 हजारो लोक मुंबईच्या सुप्रसिद्ध गोवालिया टँकवर एकत्र जमले होते. पोलिसांची पर्वा न करता श्रीमती अरुणा असफअली या महिला कार्यकर्तीने स्टेजवर चढून तिरंगा झेंडा फडकावला. गांधीजींचा 'करेंगे या मरेंगे' चा नारा दिला. ब्रिटिश पोलिसांनी लाठीमार करून, अश्रुधुरांची नळकांडी फोडून सभा उधळली. धरपकड सुरू झाली. एकच गोंधळ झाला. वसंतदादा डोळे चोळत चोळत त्या धरपकडीतून निसटले ते थेट पानबाजारातील आपल्या मुंबईतील मुक्कामावर येऊन पोचले. सातारा भागातील कार्यकर्ते रात्रीपर्यंत तेथे एकत्र जमले. आता धरपकड होणार हे निश्चित होते. सर्वांनी एकत्र न जाता, पांगून वेगवेगळ्या मार्गानी आपापल्या गावी जावे असे ठरले. परतल्यावर वसंतदादांच्या लक्षात आले की बहुतेक सर्व पुढाऱ्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड झाली. बाकीच्या कार्यकर्त्यांवर केव्हाही पकड वॉरंट निघतील अशी स्थिती होती. अशा स्थितीत सर्व कार्यकर्ते अंकलखोपला तात्या सूर्यवंशी त्यांच्या घरी जमले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्वांनी भूमिगत राहूनच लढा पुढे चालविण्याचे ठरले. सर्वत्र गोंधळ माजला होता. सर्व पुढारी तुरुंगात अडकले असल्याने कार्यकर्ते आपापल्या मगदूराप्रमाणे स्वातंत्र्यलढा चालवत होते.

 जहाल क्रांतिकारक :

 यानंतरच्या काळात वसंतदादांचे दर्शन एका वेगळ्याच आक्रमक

१४ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील