पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वि. स. पागे तासगावला तर धुळाप्पा नवले भिलवडीला सत्याग्रह करणार होते. पद्माळे गावातून मिरवणुकीने वसंतदादा बिसूरला गेले आणि २४ मार्च १९४१ रोजी सत्याग्रह करून त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. त्यांना सहा महिन्यांची कैद झाली. कुटुंबियांपासून, आपल्या हितचिंतकांपासून दूर येरवड्याच्या तुरुंगात राहणे वसंतदादांना त्रासदायक वाटले नाही. कारण त्यांनी तशी मनाची तयारी केली होती. पण एक दुःख पचवणे त्यांना अवघड गेले. त्यांच्या पहिल्या-वहिल्या अपत्याचे - मुलीचे, तुरुंगात शिक्षा भोगत असताना दुःखद निधन झाले. वसंतदादा काही काळ अस्वस्थ झाले. काहीनी त्यांचे दुःख बघून सल्ला दिला 'अर्ज करून माफी माग, घरी सोडतील' माफी शब्द ऐकताच वसंतदादा एकदम सावध झाले. त्यांना गांधीजींच्या अटींची आठवण झाली. दृढनिश्चयाने ते म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत मी माफी मागणार नाही. मी सत्याग्रही आहे. तो नियम मी मोडणार नाही. सर्व शिक्षा मी पुरी करणार."
 वसंतदादांनी त्या स्वर्गवासी छोट्या जीवाची मनोमन क्षमा मागितली आणि दृढनिश्चयाने आपल्या वाटेची शिक्षा पूर्णपणे भोगली. १९४१ च्या ऑक्टोबर महिन्यात येरवडा जेलमधून वसंतदादांची मुक्तता झाली.

 पण वसंतदादांना देश स्वतंत्र होईपर्यंत विश्रांती नव्हती. सर्व देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. जनतेच्या मानसिकतेची अचूक नाडी ओळखणाऱ्या गांधीजींना देशातल्या या प्रचंड ऊर्जेचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पूर्णपणे उपयोग करून घ्यायचा होता. त्यांनी मुंबईला १९४२ च्या ७ आणि ८ ऑगस्टला काँग्रेसचे अधिवेशन बोलावले.

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / १३