पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या धाकट्या भावाच्या देशप्रेमाचे कौतुक होते. त्यांनी घरची, शेतीची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि शेवटपर्यंत पेललीही. गावपातळीवर काम करता करता, त्यांची कामातील धडाडी, तडफ बघून लवकरच वसंतदादांना तासगाव तालुका काँग्रेसचे सेक्रेटरी करण्यात आले. पूर्वी ते सांगलीत येतच पण आता काँग्रेसच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्या सांगलीच्या फेऱ्या वाढल्या. समर्थ खादी भांडारचे नाना जोशी, गजानन हुद्दार, डॉ. देशपांडे, मेघजी नरसी, ताराचंद शहा असे त्यांचे सांगलीचे मित्रमंडळ वाढतच राहिले. याच दरम्यान वसंतदादांचा त्यांच्या कागलच्या मामाच्या मुलीबरोबर, मालतीबरोबर विवाह झाला.
 दुसरे महायुद्ध सुरू होते. ब्रिटिश सरकारवरील स्वातंत्र्य-चळवळीचा दबाव वाढावा म्हणून गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली. सत्याग्रहींची निवड करताना तो सत्याग्रही खादी वापरणारा, खोटे न बोलणारा, दारू न पिणारा, जेलचे नियम पाळणारा आणि कोणत्याही परिस्थितीत माफी न मागणारा असावा अशा काही पूर्वअटी होत्या. या निष्कर्षावर निवडल्या जाणाऱ्या सत्याग्रहींची नावे अंतिम पसंतीसाठी थेट गांधीजींपर्यंत जात. अशा कडक चाळण्यांमधून वसंतदादांची निवड झाली तेव्हा स्वाभाविकपणेच त्यांना त्याचा खूप आनंद झाला. ही वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम त्या काळात खूप गाजली होती.

 पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यापेक्षा पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबाजींची निवड केली तेव्हा त्या काळी सर्वांना खूप आश्चर्य वाटले होते. वसंतदादांची बिसूरच्या सत्याग्रहासाठी निवड झाली होती. त्यांचे सहकारी आर. पी. पाटील धामणीला, दीपचंद व्होरा कुपवाडला,

१२ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील