पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मित्रांशी पोटतिडकीने बोलत असताना वसंतदादांनी सर्वांसमोर घोषणा केली. सोलापूरच्या फाशी गेलेल्या तरुणांची आठवण सतत मनात जागी रहावी म्हणून आपण चहा सोडत असल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले आणि खरोखरच कठोरपणे आपला निश्चय पाळला. चहाचा कप पुन्हा तोंडाला लावला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतरच.
 अशी दृढनिश्चयी माणसेच आयुष्यात काही करू शकतात. त्यावेळी सांगली सातारा जिल्ह्याच्या हद्दीत होते आणि सातारा जिल्हा राजकीय चळवळीत तर आघाडीवर होता. त्याच सुमारास पं. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचे सातारा जिल्ह्यात दौरे झाले. हे दोन्ही नेते तत्कालिन तरुणांचे हिरो होते. काँग्रेसने हिंदुस्थानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचा व त्यायोगे शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा उद्धार करण्याचा एक कार्यक्रमच जाहीर केला होता. म. गांधी, नेहरू, सुभाष आदी नेत्यांच्या प्रभावामुळे अनेक तरुण भारून गेले आणि काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली एकत्र आले. अशा परिस्थितीत वसंतदादा कसे मागे राहतील?
 १९३७ सालापासून म्हणजे ऐन विशीतच वसंतदादांनी काँग्रेसचे कंकण हाती बांधले.

 त्यांच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाला सुरुवात झाली. काँग्रेसची पत्रके खेडोपाडी वाटणे, पक्षाची धोरणे सर्वांना समजावून सांगणे, स्वदेशी खादीचा प्रचार करणे अशी कामे वसंतदादा हौसेने करू लागले. अर्थात या साध्या दिसणाऱ्या गोष्टी पारतंत्र्याच्या काळात तितक्या सोप्या नव्हत्या. पोलिसांचा ससेमिरा नेहमी मागे लागत असे. घरच्या मंडळींना संकटात टाकल्यासारखे होई. पण थोरल्या शामरावदादांना

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ११