पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. पण त्यांनी राजकारणात पडायचे असे काही ठरवले नव्हते. तर देश स्वतंत्र करण्यासाठी झटायचे असे त्यांनी ठरवले आणि त्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही करणे शक्य नसल्याने ते काँग्रेसच्या कामात झोकून दिले.
 ते जरी पद्माळमध्ये राहत असले तरी त्यांचे सातत्याने सांगलीतील मित्रांकडे जाणे-येणे असे. त्यांच्याबरोबर चर्चासत्रे झडत. त्यांच्या मनावर एका घटनेचे पडसाद खूप खोलवर उमटले होते. ती घटना म्हणजे सोलापूरचे ताडी-विरोधी आंदोलन. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार दारूची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर घोषणा देऊन लोकांना दारू पिण्यापासून परावृत्त करणे, दारू निर्माण करणाऱ्या ताडीच्या झाडांची तोड करून, ताडीचे उत्पादनच बंद करणे अशा मार्गांनी आंदोलन चालू होते. महात्माजींच्या मिठाच्या कायदेभंग चळवळीप्रमाणेच या आंदोलनालाही जनतेतून चांगला पाठिंबा मिळत होता. तथापि सोलापूरच्या या चळवळीला पोलिसांच्या अरेरावी वृत्तीमुळे थोडे हिंसक वळण लागले. लोकांनी प्रक्षुब्ध होऊन दोन पोलिसांना पोत्यात घालून जाळले. मग मात्र पोलिसांनी कठोरपणे परिस्थिती हाताळली. ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा पुकारला. मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, कुरबान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे अशा चार तरुणांना फाशी दिले. त्या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. त्यावेळी वसंतदादा सांगलीत होते. सर्वत्र उमटलेले तीव्र पडसाद वसंतदादांच्या संवेदनक्षम मनाने टिपले.

 देशाच्या पारतंत्र्याची पहिली कठोर जाणीव त्यांना झाली. १९३०- ३१ मध्ये या गोष्टी घडल्या तेव्हा वसंतदादांचे वय १३-१४ वर्षांचे होते.

१०/ सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील