पान:समता (Samata).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना boss | सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. जग जवळ येत चाललंय. मोबाईल, फेसबुक, इंटरनेट, एसएमएस या सगळ्यामुळे संपूर्ण जग हे एक मोठं खेडं झालंय असं बोलतात. पण प्रत्यक्ष जीवनात मुलींना, बायकांना जगण्याच्या संघर्षात जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या कशा पार पाडाव्यात याविषयी मनात गोंधळ निर्माण होतो, असहाय्य वाटतं, आपल्याला सुरक्षित करणा-या कायद्याची, लोकांची, यंत्रणेची सखोल माहिती असती तर किती बरं झालं असतं असे वाटते. 'मुलींना वाचवा, मुलींना शिकवा' हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे असे रेडिओवर, टी.व्ही. वर बोललं जातं, परंतु खरे तर मुलींना वाचविणे, मुलींना शिकविणे आणि माणूस म्हणून त्यांच्यातून एक स्वावलंबी व्यक्ती बनविणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. हा जीवन संघर्ष प्रत्येक मुलीच्या, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तो अटळ आहे. पण योग्य माहिती उपलब्ध असेल, तिचा कायदेशीर वापर करून आपल्या विषयी जागरूक रहायचे याचे प्रशिक्षण असेल तर हा संघर्ष जरी अटळ असला तरी सुसह्य होवू शकतो. म्हणूनच या पुस्तिकेच्या माध्यमातून आपण एक मुलगी म्हणून, एक माणूस म्हणून, आपण जन्माला आल्यापासून आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या कायद्यांची, ते राबविणा-या सरकारी यंत्रणेची आणि आपल्याला मदत करू शकणा-या व्यक्ती आणि संस्थांची माहिती करून घेणार आहोत. माहिती असेल तर आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वास असेल तर माणूस निर्भय होतो आणि निर्भय माणसाचे कोणीच कधी वाकडे करू शकत नाही आणि म्हणूनच मुलींना स्वसंरक्षणासाठी अधिक माहिती असली पाहिजे. त्या माहितीचा वापर करून आत्मविश्वासाने, निर्भयपणे आलेल्या अडचणींवर त्या मात करू शकल्या पाहिजेत. त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही एवढ्या त्या सक्षम बनल्या पाहिजेत. चला तर मग, आपण कायदा समजून घेवूया. कायदा म्हणजे थोडक्यात निती-नियम, काय करावं आणि काय करू नये याबाबतची बंधने. कारण माणूस हा बुद्धिमान प्राणी असून जीवनभर