पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वतन नसले तरी नि:स्वार्थी बुद्धीने परोपकारच त्यांच्या हातून घडत असतो. त्यांनी वाङ्मयाची उपासना नित्य चालू ठेवली पाहिजे. साहित्य संमेलन हे या उपासनेतले एक वार्षिक व्रत आहे. या व्रतानुष्ठानात एक वेळाही खंड न पडू देण्याची आपला निश्चय असल्यास तो तडीस जाणे कठीण नाही.'
 आपण सारे साहित्य रसिक याचे पालन करीत स्वतंत्र भारतात खंड न पडू देता वार्षिक संमेलने भरवत केळकरांच्या अपेक्षांची व त्यांच्या माध्यमातून मायमराठीच्या उपासनेची पूर्तता करीत आहोत, अशीच माझी भावना आहे.
 १९३२ मध्ये कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खुद्ध सयाजीराव गायकवाड महाराज होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘वाङ्मय म्हणजे मनुष्याच्या मुखातून बाहेर पडलेली जी बाचा तिचा संग्रह' अशी वाङ्मयाची एक सर्वमान्य होणारी व्याख्या केली होती. त्यांना ज्ञानाधिष्ठीत विवेकी व सुसंस्कृत समाज घडवायचा असल्यामुळे त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘भावनात्मक' (म्हणजे ललित) वाङ्मयापेक्षा ‘बौद्धिक' (ललितेतर- ज्ञानमाहितीपर साहित्य) वाङ्मयाला त्यांनी अधिक प्रोत्साहन दिले, त्या काळी समाजाला प्रथम साक्षर, मग वाचक आणि तद्नंतर ज्ञानसंपन्न करण्यासाठी ललितेतर साहित्यास प्राथमिकता असणे यथायोग्यच होते. लोकशिक्षणासाठी काय प्रयत्न आपण केले हे सांगताना महाराज आपल्या भाषणात म्हणतात,
 “आता स्वत: आम्ही वाङ्मयाचा कार्यासाठी काय काय झीज सोसली हे सांगणे आत्मप्रशंसेसारखे दिसेल. परंतु आमचे अनुकरण करू इच्छिणा-यांस मार्ग दाखवावा व आमचे चुकत असल्यास योग्य तो सल्ला आपण द्यावा या हेतूने दोन शब्द सांगण्याची परवानगी घेतो. सक्तीचे प्राथमिक शिक्षण व दिलेले शिक्षण विसरून जाऊ नये म्हणून ग्रामपुस्तकालयाची स्थापना हे प्रथम यत्न झाले. राष्ट्रकथामाला, ज्ञानमंजुषा, महाराष्ट्र ग्रंथमाला वगैरे पुस्तकमाला काढण्यात सुमारे अडीच लक्ष रुपये (त्या काळाचे - म्हणजे आजचे किती याचा अंदाज करावा) खर्च झाल्यावर सन १९१२ साली दोन लक्ष रुपयांचा निधी वेगळा ठेवून त्याच्या व्याजात ग्रंथप्रकाशनाची व्यवस्था झाली. त्याचप्रमाणे जुने अभिजात ग्रंथ कसरीच्या भक्षस्थानी पडून नष्ट होऊ नयेत म्हणून प्राच्य ग्रंथमाला, तसचे सयाजीराव छात्रवृत्त्या, नाटक मंडळ यांच्या नेमणुका, राजकवीची नेमणूक, गुजराथी व मराठी पुस्तकांचे उल्लेखालय (रफरन्स लायब्ररी), कॉलेजमध्ये अध्यापकवृत्ती वगैरे अनेक मार्गांनी लोकभाषा गुजराथीप्रमाणेच मराठी भाषेच्या व वाङ्मयाच्या अभ्यासाची साधने आम्ही निर्माण केली आहेत.'

 श्रोते हो, महाराजांच्या भाषणाच्या या उताच्याकडे आपण अधिक लक्ष दिल्यास हे लक्षात येईल की, आज महाराष्ट्रात व देशातही ग्रंथालयाच्या संदर्भात

६/ ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन