पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षेत्रात कार्य करणारे डॉ. गणेश देवी यांचे कार्यही आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान प्राप्त करणारे ठरले आहे.
 आज सुरू होणारे ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे बडोद्यामधील चौथे संमेलन आहे. १८७८ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन सुरू केले, त्यानंतर १९४७ पर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळात सत्तर वर्षांत ३१ साहित्य संमेलने झाली, त्यातील तीन संमेलने बड़ोदा येथे संपन्न झाली. १९०९ साली कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली, १९२१ मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली तर १९३४ मध्ये नारायण गोविंद चाफेकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले. याचाच अर्थ बडोद्याची वाङ्मयीन परंपरा पुण्याखालोखाल समृद्ध होती असा लावला तर अनुचित होणार नाही. साहित्य संमेलनांच्या काही अध्यक्षांनी नवे वाङ्मयीन सिद्धान्त मांडले आहेत. त्याची सुरुवात बडोद्याला १९२१ साली न. चिं. केळकरांच्या वाङ्मयाबाबत सविकल्प समाधीचा' अजरामर सिद्धान्ताने झाली, ती आजही वाङ्मयीन आस्वादासाठी महत्त्वाची आहे. केळकरांनी ‘खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय' अशी व्याख्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मांडली. त्याबाबत स्पष्टीकरण देताना, त्यांनी जे विवेचन केले आहे, ते त्यांच्याच शब्दांत उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. मुख्य म्हणजे प्रत्येक रसिक वाचकांना वाचनानंद घेताना तो प्रत्ययास आल्याविना राहत नाही. केळकर खरी सविकल्प समाधी उत्पन्न करते ते वाङ्मय, हो सिद्धान्त अशा त-हेने उलगडून दाखवतात.
 "निर्विकल्प समाधीत बाहेरच्या जगाची किंबहुना आपल्या देहाचीही काही एक जाणीव शिल्लक उरत नाही व उरताही कामा नये; पण वाङ्मय सेवनाने निर्माण होणा-या समाधीत स्वत:च्या मनोभूमिकेची जाणीव तर उरतेच, पण वर दर्शविलेल्या इतर भूमिकाही तीत समाविष्ट होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, तेच वाङ्मय अधिक उत्कृष्ट की ज्यांच्या सेवनाने अधिकांत अधिक कल्पना मनात एकदम उठतील व अधिकाधिक भूमिकांचा मानस अनुभव घडेल. या दृष्टीने पाहता सुंदर कल्पनाकल्लोळ ही वाङ्मयप्रेमी मनुष्याला इष्टापत्तीच होय."
 आज अनेकजण दरवर्षी भरणा-या शतकी परंपरा असलेल्या साहित्य संमेलनाला उरूस' वा 'जत्रा' म्हणत टीका करतात, त्यालाही १९२१ सालीच केळकरांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे, तेही आज सर्व उपस्थित रसिकांना त्यांच्याच शब्दात सांगत या टीकाकारांना मी उत्तर देऊ इच्छितो.

 ‘वाङ्मयग्रंथकार हे तर स्वयंभूच असतात. एका ग्रंथकाराने म्हटले आहे की, 'Literary men have neither ancestors nor posterity: they alone compose their whole race.' वाङ्मय ग्रंथकारांना कुलपरंपरा किंवा

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ५