पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिमानाने सांगता येते. त्याचबरोबर सुप्रसिद्ध इतिहासकार विनायक सदाशिव बाकसकर यांचेही कार्य या विषयात महत्त्वाचे आहे. तसेच आधुनिक मराठी वाङ्मयेतिहास लेखनाचे उगमस्थानीचे ग्रंथ म्हणून ग. रं. दंडवतेंचे 'बडोद्याचे मराठी साहित्य' (१९२५), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मय' (१९२९), ‘महाराष्ट्र नाट्यकला आणि नाट्यवाङ्मय' (१९३१) या ग्रंथांची नावे घ्यावी लागतात. वाङ्मयेतिहास लेखनातील हे सातत्य वि. पां. नेने यांचे ‘अर्वाचीन मराठी साहित्य' (१९३५), वि. पां. दांडेकरांचे 'मराठी साहित्याची रूपरेषा' (१९५२), सुषमा करोगलांच्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता' यासारख्या ग्रंथातून समोर येते. 'ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (१९२१) हा मंगेश कमलाकर नाडकर्णीनी इंग्रजीतून लिहिलेला मराठी वाङ्मयेतिहासही पहिला म्हणून महत्त्वाचा आहे. मराठी छंद:शास्त्रात ज्यांचे प्रभुत्व निर्विवाद मान्य केले जाते, त्या प्रा. ना. ग. जोशी यांचे मोठे योगदान आहे. नाट्य, काव्य, विनोद या तिन्ही क्षेत्रात निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वतातील सिद्धहस्त लेखक नवसारीचे राम गणेश गडकरी, केशवसुतांना समकालीन असलेले प्रतिभासंपन्न अभिजातवादी कविश्रेष्ठ राजकवी चंद्रशेखर, मराठी साहित्यात शुद्ध निखळ विनोदनिर्मितीचा अनुपम ठेवा निर्माण करणारे प्राकृत आणि अर्धमागधी भाषातज्ज्ञ चिं. वि. जोशी हे बडोदे संस्थानाने मराठी साहित्याला दिलेली अमोल मौक्तिके आहेत. या वाङ्मयीन वातावरणात कवी दत्त, माधव ज्युलियन, वि. पां. दांडेकर, भाषातज्ज्ञ ना. गो. कालेलकर, वा. वि. जोशी, दा. ना. आपटे, नानासाहेब शिंदे, स. वि. देशपांडे, अपर्णाबाई देशपांडे, पत्रकार भालेकर आणि वि. न. कीर्तने यांच्या साहित्यनिर्मितीला, विचारचिंतनाला बहर आलेला दिसतो. यशवंतांनी मिळालेली ‘राजकवी' ही सन्मानपदवी या संदर्भात महत्त्वाची घटना. बडोद्यातील एका तपाहून अधिकच्या वास्तव्यात बहरत गेलेली श्री. अरविंदांची साहित्य संपदा व ‘सावित्री' या महाकाव्यास केलेला प्रारंभ, ‘अभिरुची'सारख्या नियतकालिकातून पु.

आ. चित्रे व विमल चित्रे यांनी नवयुगाच्या संवेदनेचा वेध घेतला. त्यात मढेकरांसारखे कवी, समीक्षक, बडोद्यातील दिनेश माहुलांसारखे जागतिक कीर्तीच्या अभ्यासकांचे लेखन तसेच माधव आचवलांचे कलारसग्रहणात्मक, समीक्षात्मक व ललितपर लेखन प्रमुख होते. दिलीप चित्रे, विनोबा भावे, वि. द. घाटे इत्यादी प्रतिभावंतांच्या मानसविश्वात या नगरीचे असलेले स्थान या सर्वांतून श्री. सयाजी महाराजांनी नांगरलेल्या भूमीत ‘सांगे कोंभाची लवलव / मातीचे मार्दव' असे रूप दिसते. या साहित्य परंपरेचा ओघ अधेमधे क्वचित क्षीण, लुप्तप्राय झालेला दिसत असला तरी, त्यातील सातत्य कायम आहे. मराठी नव्वदोत्तर कवीतील सचिन केतकर हा महत्त्वाचा कवी मराठी काव्यप्रवाहाला नवे परिमाण देऊ पाहात तिची काव्यशास्त्रीय तात्त्विक भूमिका मांडतो आहे. भाषा, मौखिक परंपरा, साहित्य या

४ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन