पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीचा प्रेमानं ते जिवंत राहावे म्हणून हे प्रयत्न करीत आहेत, त्याला खरोखरच सलाम केला पाहिजे.
 पण बृहन्महाराष्ट्राच्या मराठीच्या संदर्भात अनेक समस्या आहेत - प्रश्न आहेत. त्याकडे ती राज्ये फारशी लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या भागातील साहित्यिक संस्था - परिषदा - मंडळे हे वाङ्मयीन नियतकालिके काढतात, ग्रंथालये चालवतात, संमेलने घेतात, पण त्यांना त्यासाठी ती राज्ये काही अनुदान किंवा मदत करीत नाहीत आणि महाराष्ट्र शासनही मोजक्याच संस्थांना अनुदान देण्याव्यतिरिक्त फारसे काही करीत नाही. त्यांचा आवाज - समस्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी मी राज्य शासनाला दोन गोष्टी करण्याचे आवाहन करत आहे.
 एक म्हणजे, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत शासनाने ‘बृहन्महाराष्ट्र मराठी विभाग' निर्माण करून तिथे एका उपसचिवाला ‘विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावे. हा बृहन्महाराष्ट्र मराठी विभाग दर तीन महिन्याला या सहा प्रांतातील महामंडळांशी संलग्न असणा-या संस्थेच्या प्रतिनिधी व महामंडळाचे अध्यक्ष, चार घटक संस्थांचे अध्यक्ष व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष यांची बैठक घेईल. त्या वेळी सचिवांनी पूर्ण वेळ हजर राहावे व मंत्री महोदयांनी तास - दीड तास द्यावा. या त्रैमासिक बैठकीत बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा, साहित्य, मराठी शाळा व शिक्षण, ग्रंथालये, नियतकालिके आदी प्रश्नावर त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या आधारे त्यांना मदत घेण्यासाठी एक धोरण आखावे.
 दोन म्हणजे बृहन्महाराष्ट्रात शालेय शिक्षणात ऐच्छिक पद्धतीने मराठी शिकण्याची सोय करण्यासाठी त्या राज्य सरकारशी संवाद साधावा. अस्तित्वात असणा-या शाळा बंद पडू नयेत, म्हणून तेथील सरकार शिक्षक नेमत नसतील (किंवा उपलब्ध होत नसतील) तर महाराष्ट्रातून शिक्षक डेप्युटेशनवर विशेष प्रोत्साहनपर भत्ता देऊन तीन ते पाच वर्षांसाठी पाठवावेत. असे धोरण आखून त्या त्या राज्य सरकारांना मान्य करण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरावा.

 तीन म्हणजे बृहन्महाराष्ट्रसाहित्य संस्थांसाठी अनुदान - मदतीचे धोरण तयार करावे. त्यात तेथील मराठी ग्रंथालयांना राज्यापेक्षा अधिकचे अनुदान देणे, वाङ्मयीन नियतकालिकांना वार्षिक अनुदान व जाहिराती देणे, तिथे भरणाच्या संमेलनांसाठी खास करून बेळगाव भागातील डझनभर गावात होणा-या एक दिवसीय संमेलनांसाठी व बडोदा, इंदोर, भोपाळ, गोवा इत्यादी बृहन्महाराष्ट्रात होणा-या संमेलनासाठी निधी देणे, शासनाचे प्रतिनिधी मंडळ तिथे पाठवणे, या राज्यात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी राज्यांकडून एक एकर जमीन मिळवणे व बांधकामाचा पूर्ण खर्च व पुढे देखभाल दुरुस्तीचा खर्च नियमित देणे आदी बाबी

५० / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन