पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्याला पुरेसा वाव द्या.
 हीच बाब दूरदर्शन वाहिन्यांची आहे. चोवीस तास बातम्यांचे चॅनल्स आणि मनोरंजन वाहिन्या वेळ भरण्यासाठी काय वाटेल ते दाखवत असतात. त्यांनी साहित्यचर्चा व कार्यक्रमांनाही प्रेक्षक वर्ग मिळतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. बातम्यांच्या चॅनल्सनी साहित्य संमेलने, पुस्तक प्रदर्शने व साहित्यिकांची भाषणे ही अधिक तपशीलाने प्रसंगी लाइव्ह दाखवण्यास काय हरकत आहे? जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या वेळी किती उच्च दर्जाची भाषणे होतात, ती लाइव्ह किंवा रेकॉर्ड करून का दाखवू नयेत? तसेच सह्याद्री वाहिनीवर साहित्यविषयक ‘अमृतवेल' हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे चालू आहे. सध्या न्यूज १८ लोकमत 'वाचाल तर वाचाल' हा कार्यक्रम करीत आहे. बाकीच्या वृत्तवाहिन्यांनी पण यांचे अनुकरण करावे. तसेच साहित्यावर आधारित मालिका एके काळी दाखवल्या जायच्या. 'श्रीकांत', 'तमस', 'अमृतवेल', 'रथचक्र' इ. आज ज्या मालिका दाखवल्या जातात, त्यात साहित्यमूल्य किती आहे? फार कमी. मग वाहिन्यांची पण प्रेक्षकांची सांस्कृतिक पातळी वाढवण्याची जबाबदारी नाही? मान्य की, येथे टीआरपीचा सारा खेळ चालतो, पण साहित्यावर आधारित जर आज मराठी चित्रपट मराठी माणसे डोक्यावर घेत असतील, उदाहरणार्थ, दुनियादारी, पार्टनर, रमा- माधव तर साहित्यावर आधारित मराठी मालिका पण ते आवर्जून पाहतील. त्यामुळे दररोज ज्या चार-पाच मालिका प्रत्येक चॅनलवर चालतात, त्यातील एक मालिका साहित्यावर आधारित त्यांनी ठेवावी व काव्यमैफल, कथाकथन आणि लेखकांच्या त्यांच्या नव्या पुस्तकावर आधारित मुलाखती आदी कार्यक्रमांनाही प्रेक्षकवर्ग मिळू शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे व याबाबींचा गांभीर्याने विचार करावा, असे मी या साहित्यपीठावरून आवाहन करत आहे.

सात
बृहन्महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय योजना

 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे राज्यातील चार विभागाच्या साहित्य परिषदा / संघासह बृहन्महाराष्ट्रातील व सहा संलग्न मंडळांनी बनवलेले आहे. कर्नाटक (गुलबर्गा), गोवा, तेलंगणा (हैदराबाद), मध्यप्रदेश (भोपाळ), छत्तीसगढ़ (बिलासपूर) आणि बडोदे हे महामंडळाचे घटक आहेत. या प्रांतात तेथील मराठी बंधू-भगिनींसाठी या संस्था विपरीत परिस्थितीत नेटाने व ध्येयाने आणि मुख्य म्हणजे

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ४९