पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिले तर, भारतीय प्रेक्षक मराठी नाटके त्यांच्या भाषेत पाहू शकतील. यासाठी ज्यांची नाटके विविध भाषेत अनुवादित होऊन रंगमंचित झाली आहेत, त्या महेश एलकुंचवार, सतीश आळेकर आदींना याची योजना करण्याचे काम देता येईल. तसा शासनाने विचार करायला काय हरकत आहे?
 आज प्रसारमाध्यमांचा कल्पनातीत असा विस्तार झाला आहे. इंटरनेट व मोबाईलमुळे आपल्या हातात सर्व माहितीचा खजिना आला आहे. तरीही लिखित वृत्तपत्राचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. पण त्याच्या जोडीला चोवीस तास बातम्या व मनोरंजन देणाच्या दूरदर्शन वाहिन्या आल्या आहेत. त्यामुळे वाचनाची आवड कमी होत चालली आहे, अशी सार्वत्रिक ओरड आहे. ती फारशी खरी नाही. पण साहित्याचं, विशेष करून ललित साहित्याचे वाचन कमी होत चाललंय ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे. कारण माणूस हा अधिक सहृदयी, मोकळा आणि उदार होण्यासाठी ललित साहित्याचे वाचन आणि आस्वाद महत्त्वाचा आहे. लोकांना पुन्हा साहित्य वाचनाकडे अधिक जोमदारपणे कसं वळवायचं, हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये प्रसारमाध्यमे मोलाची कामगिरी बजावू शकतात.

 आज वृत्तपत्राच्या रविवारच्या पुरवण्यात पुस्तक परीक्षण व साहित्यपर लेखांना फार कमी स्थान मिळतं. खरं तर, आज सर्वच वृत्तपत्रांच्या ८ ते १२ पानांच्या शनिवारी- रविवारी पुरवण्या निघतात. त्यांच्यात सिनेमा व क्रीडाविषयक बातम्या व लेखांना वाजवीपेक्षा जास्त स्थान दिलं जातं. माझी सर्वच वृत्तसंपादकांना विनंती आहे की आपले साहित्यविषयक काहीच उत्तरदायित्व नाही का? मी सर्वच वृत्तपत्रांच्या मालकांना, संपादकांना हे सांगू इच्छितो की, 'हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रात दरमहा एकदा चार पानांची एकही जाहिरात नसलेली साहित्य पुरवणी निघते. त्यात पुस्तक परीक्षण, मुलाखती व साहित्य समीक्षापर लेख असतात. त्यांच्या इतर रविवारच्या अंकातही पुस्तकांना विशेष स्थान असतं. दर शनिवारी, ‘इंडियन एक्स्प्रेस'मध्ये साहित्याचं एक पान असतं, मराठी वृत्तपत्रसृष्टीतही काही वर्तमानपत्रे साहित्याला आवर्जून जागा देतात, पण ते पुरेसं नाही. त्यात वाढ केली पाहिजे. कारण वर्तमानपत्राइतकं साहित्य प्रसाराचं प्रभावी माध्यम नाही. 'हिंदू' वृत्तपत्राने काही वर्षापासून 'हिंद लिट फेस्ट' नामक इंग्रजी साहित्य संमेलन घेण्यास प्रारंभ केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' पण मुंबईला असेच तीन ते पाच दिवसांचे लिटरेचर फेस्टिव्हल घेत आहे. मराठीत असा प्रयोग व्हायला काय हरकत आहे? हा प्रयोग ‘दिव्य मराठी'ने नाशिकमध्ये सुरू केला आहे, इतर वृत्तपत्रांनी त्याचे अनुकरण करीत असे साहित्य महोत्सव सुरू केले तरी, साहित्य व्यवहारांना बळ मिळेल. त्यामुळे माझी सर्व वृत्तपत्रे आणि साप्ताहिकांना ही विनंती आहे की, तुम्ही गांभीर्याने विचार करून

४८ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन