पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सीबीएससी, आयसीएससी आदी शाळांनी जर मल्याळी भाषा शिकवली नाही, तर त्यांची परवानगी रद्द केली जाईल, अशी कायद्यातच तरतूद करण्यात आली आहे.
 या दोन राज्यांनी इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व म्हणण्यापेक्षा इंग्रजीचे प्रस्थ आणि पालकांची इंग्रजीकडे ओढा असणारी मानसिकता लक्षात घेऊन हा कायदा केला आहे. त्यात मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायची व त्याद्वारे पालकांच्या मानसिकतेला कुरवाळायची मुभा दिली आहे, त्यामुळे त्यांचा विरोध राहत नाही. पण त्याच वेळी आपली भाषिक ओळखही मातृभाषा शिकवून - सक्तीची करून ठेवण्यात ही दोन्ही राज्ये यशस्वी होणार यात शंका नाही.
 कर्नाटक राज्याने तर या पुढे जात दोन दशकांपूर्वी 'The Kannada Development Authority Act, 1994' हा कायदा आणून कन्नडभाषा विकासासाठी कायदेशीर तरतूद केली आहे व अॅथॉरिटी फंड'ही स्थापन केला असून भरघोस निधी दिला जातो. ही अॅथॉरिटी सर्व स्तरांवर कन्नड भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम आखते व 'वॉच डॉग'सारखे काम करते.
 या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इंग्रजी व हिंदी-उर्दू आदी माध्यमांच्या शाळा पाहिल्या तर, तिथे सार्वत्रिकपणे दसरी भाषा मराठी अनिवार्य नाही. बहुसंख्य इंग्रजी शाळा तर दुसरी भाषा म्हणून फ्रेंच किंवा जर्मन घेण्यासाठी उत्तेजन देतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळेतील मलांना देवनागरी लिपीही येत नाही, मग मराठी भाषेला ते कायमचे पारखे होणार नाहीत तर काय होणार?
 विषयाचे नीट व संपूर्ण आकलन होणे आणि व्यवस्थित ज्ञान ग्रहण करणे यासाठी मातृभाषेतच शालेय शिक्षण असणे नैसर्गिक व आवश्यकही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केरळ व तामिळनाडूप्रमाणे यथाशीघ्र 'The MarathiLearning Act' केला पाहिजे. त्याला कोणताही राजकीय पक्ष विरोध करणार नाही व सरकारने इच्छाशक्ती दाखवत पुढाकार घेतला तर निश्चितच हा कायदा पास होणे अवघड नाही. मी मराठी लेखकांचा व बारा कोटी मराठी भाषकांचा संमेलन अध्यक्ष म्हणून प्रतिनिधी आहे, त्या नात्याने व नैतिक अधिकाराने मी राज्य शासनाला कळकळीची विनंती करतो की, मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी ही इच्छाशक्ती वे राजकीय निर्धार दाखवावा, असा कायदा हा संविधान संमत आहे, हे विचारपूर्वक सांगतो.

 अशा कायद्यामुळे महाराष्ट्रात राहाणारा व विविध माध्यमांच्या शाळेत शिकणाच्या प्रत्येक मुलास उत्तम मराठी तो शालांत परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा येईल आणि लोकव्यवहाराची भाषा शंभरटक्के मराठी होऊ शकेल! आज मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे यांसारख्या शहरात एक मोठा वर्ग असा आहे की, तो मराठीचा एक अक्षरही न बोलता आपला चरितार्थ, व्यवसाय व जीवन कंठू शकतो. दक्षिण राज्यात

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ३५