पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पराभूत मानसिकतेची खंत करणे पण आपण मराठी माणसांनी सोडून दिली आहे. आज ज्यांना ज्यांना शक्य आहे ते पालक इंग्रजी शिक्षण म्हणजे यशाचा पासवर्ड समजून अट्टाहासाने आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत - तेथील निकृष्ट गुणवत्तेकडे कानाडोळा करीत घालत आहेत, तर ज्यांना इंग्रजी शाळेची गलेलठ्ठ फी देणे परवडत नाही, ते पालकही अनुकरण करीत कर्जपाणी काढीत तीच वाट अनुसरत आहेत. याला २०१२ च्या कायद्यानं गती आली असून आता खासगी कंपन्यांना शाळा उघडण्याची परवानगी देणाच्या कायद्याने अधिक वेग येणार आहे. शासनाला कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी'च्या माध्यमातून दिलेला इशारा 'भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे' याचे भान उरले नाही, याची मला खंत व चिंता वाटते आणि चीडही येते. मला पुन्हा कविश्रेष्ठांचे शब्द वापरून या मंचावरून शासनाला इशारा द्यावासा वाटतो की, 'गुलाम भाषिक होऊनि आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका!'
 महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी २२ डिसेंबर १९६० रोजी विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मांडलेले काह्म विचार सूत्ररूपाने आजच्या शासनाच्या विचारार्थ मांडतो.
 मराठी भाषिक राज्याचे माझ्या मनात चित्र काढण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो, तेव्हा मराठी जनता राजसिंहासनावर येऊन बसली आहे, असे चित्र उभे राहण्याऐवजी या सिंहासनावरच मराठी भाषा विराजमान झाली आहे, असेच चित्र माझ्या मनात चितारले जाते!'
 आज मराठी भाषा चिंध्या पांघरून मंत्रालयासमोर जीवदान मागत आहे, असे जर मी विधान केले तर शासनाने ती अतिशयोक्ती मानू नये. कारण आजच मुंबई, महानगरे व मोठ्या जिल्हा मुख्यालयी शिक्षणाची तर सोडा बोलण्याची व जनव्यवहाराची भाषाही मराठी राहिली नाहीये, हे कटू वास्तव आहे आणि पुढील काळात आपण काही उपाययोजना केली नाही तर ग्रामीण भागातही ब-याच अंशी हीच परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे, हे सांगायला तज्ज्ञांची किंवा ज्योतिषाची गरज नाही.
 'जेव्हा राज्यभाषेचा दर्जा भाषेला (येथे मराठीला) प्राप्त होतो. तेव्हा लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण त्या भाषेकडे पाहत असतो.'

 'मराठी भाषेचे राज्य आल्यानंतर ज्ञानाच्या सर्व क्षेत्रातील संपदा तिने मराठी जीवनात आणली पाहिजे. त्याकरिता मराठी भाषा ही अधिक विचारप्रवाही, अधिक विचारवाही झाली पाहिजे.'

३२ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन