पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे देश नामक भूभागातील लोकांमध्ये परस्परांबद्दल बंधुभाव, सहकार्य सामाजिक एकरूपता असणे होय!' सर्वांना मूलभूत अधिकार बहाल करीत त्यांच्यात समता व बंधुता निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वक भारतीय संविधानाची रचना झाली आहे, हे कुणीही विसरता कामा नये. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद स्वीकारून भारताचा राष्ट्रवाद घडत गेला आहे. त्यामुळे 'Idea of Nation' या राष्ट्रकल्पनेमध्ये बहुधार्मिकता, बहुसांस्कृतिकता आणि शांततामय सहअस्तित्व यांना मोलाचे स्थान आहे व त्यातूनच भारताचा राष्ट्रवाद विकसित झाला आहे. पण देश म्हणजे केवळ भूभाग नाही तर तिथली माणसे असतात, म्हणूनच गुरुदेव टागोर म्हणतात ते महत्त्वाचे आहे, राष्ट्रवादापेक्षा माझ्यासाठी मानवता महत्त्वाची आहे. आज राष्ट्रवादाच्या नावाने काहींवर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारणे, खटले भरणे आणि माणुसकी विसरणे असे प्रकार होत असताना, गुरुदेवांचा विचार सांगण्याची व आचरण्याची गरज मला वाटत आहे. महात्मा गांधींनी पण असेच विचार मांडले आहेत.
 'For me patriotism is the same as humanity. I am patriotic because I am human and humane. It is not exclusive.'
{{gap}म्हणजेच गांधींच्या मते देशभक्ती (व राष्ट्रवाद) आणि माणुसकी - मानवता अलग नाहीत. म्हणून राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक असतो, तो कुणा गट पंथ वंशाला वगळत नाही. आज या विरुद्ध घडताना दिसत आहे. म्हणून माझी चिंता मी या मंचावरून व्यक्त करीत आहे. समझनेवालों को इशारा काफी है!

 म्हणून मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुढे जात, मला व सर्व भारतीयांना त्यांचे सांस्कृतिक स्वातंत्र्य पूर्णपणे पण कायद्याच्या मर्यादेत विना दडपण उपभोगता आलं पाहिजे, असे प्रतिपादन करतो. सांस्कृतिक स्वातंत्र्यात मी काय खावं, कोणता पेहराव करावा, हे जसं येतं तसंच माझं लैंगिक स्वातंत्र्य येतं - ते वेगळे आहे म्हणून कुणाला गुन्हेगार ठरवलं जाऊ नये! तसंच भाषण, लेखन व एकणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे व तो माझ्या मानवी व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कुणी घाव घालत असेल, त्याला तडे जात असतील तर प्रत्येकानं व विशेषत्वानं लेखक-कलावंतानं आवाज उठवला पाहिजे व आपल्या स्वातंत्र्याचा कोणत्याही प्रकारे संकोच होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सरकारने ती वेळ कुणावर येणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे,अशी मी आज अपेक्षा व्यक्त करतो.आशा आहे की, माझं हे अरण्यरुदन ठरणार नाही!

३० / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन