पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकतात, तेव्हा मी स्वस्थ बनू शकत नाही. मी त्यांच्यासाठी व त्यांच्याबाजूने आवाज उठवणार. पण माझा मार्ग साहित्याचा आहे व लेखणी हे माझे शस्त्र - माध्यम आहे. पुन्हा माझ्या भारतीय संविधानानं मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे. आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मला सामान्य माणसाची अस्वस्थता, दु:ख, खदखद व्यक्त करू द्या. ती व्यवस्थेनं ऐकावी, समजून घ्यावी व बदलण्याचा प्रयत्न करावा म्हणून.
 शंभर वर्षांपूर्वी ह. ना. आपटेंनी दुष्काळाचा वेध घेणारी एक दीर्घ कथा लिहिली होती. ‘काळ तर मोठा कठीण आला' सामान्य माणसांसाठी आजचा काळ तर फारच मोठा कठीण आला आहे. शिक्षणामुळे आलेलं आत्मभान पण बेकारी व रोजगार विरहीत विकासामुळे प्रामाणिक व समाधानी जीवन जगता न येणं, हे आजचे रोकडं काळं वास्तव आहे. साध्या, किमान गरजांचीही पूर्तता न होता अभावाचं जगणं जगावं लागणं ही भारतातल्या एका फार मोठ्या लोकसंख्येची तेवढीच फार मोठी शोकांतिका आहे. मूठभरांची श्रीमंती व वाढती विषमता, खरे प्रश्न सोडवता येत नाहीत म्हणून पद्धतशीरपणे बुद्धिभ्रंश करीत धार्मिक उन्माद निर्माण करणं, जुन्या भूतकालीन इतिहासात जगायला लावणं आणि आजच्या तरुणाईला पथभ्रष्ट - गुमराह करणं, स्त्रिया-बालके व वाढत्या लोकसंख्येचे ज्येष्ठ नागरिक यांचे बिकट प्रश्न, हे। पाहता पुन्हा हताशपणे ‘काळ तर मोठा कठीण आला' असंच म्हणायची वेळ आली आहे. या कठीण काळाचा आरसा मला तुम्हाला दाखवू द्या.

 भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषिसंस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा शेतक-याच्या वाढत्या आत्महत्या हे आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे. मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न - दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. म्हणून शेतक-यांच्या संदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या नव्या वर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीच्या बातमीकडे मला आपलं लक्ष वेधू द्या. 'शेतकरी घरातील स्त्रियांना नवरा हवा आहे. शिपाई पण चालेल, पण शेतकरी नको त्या बातमीत दरमहा वीस हजार रुपये शेतीतून उत्पन्न कमावणाच्या एका शेतक-याची सत्यकथा आली आहे. गेली दहा वर्षे त्याला एकही मुलगी चांगली शेती असूनही पसंत करत नाही. मागच्या वर्षी या संदर्भात काही गावांचे सर्वेक्षण झालं होतं, त्यातून शेती करणाच्या तरुणांचं लग्न होणं किती कठीण झालं आहे, हे विदारक चित्र समोर आलं आहे. त्यामुळे व शेती परवडत नसल्यामुळे मागील काही वर्षांत एक कोटीहन जास्त शेतक-यांनी शेती सोडली आहे. जे आज शेती करतात. ते नाइलाजानं. त्यांना दुसरा रोजगार मिळाला असता तर, त्यांनीही शेती सोडली असती. जगण्यासाठी शिक्षण-आजारपणासाठी पुरेसं उत्पन्न काबाडकष्ट करूनही

१८ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन