पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माझे बहुतांश लेखन याच भूमिकेतून झालं आहे. मला हे मान्य आहे की, एक लेखक म्हणून मी हे जग कदाचित बदलू शकणार नाही, पण बदलणा-या जगात काय असावं, काय असू नये याची नीलप्रत - ब्ल्यू प्रिंट मी देऊ शकतो. उदाहरणार्थ, या जगात बालमजुरी प्रथा असता कामा नये, कोणत्याही मुलाचं बालपण गरिबीमुळे हरवता कामा नये, त्यासाठी मी 'हरवलेले बालपण' कादंबरी लिहिली किंवा स्त्रीभ्रूणहत्या हे सामाजिक पातक आहे, (म्हणून ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह मी सिद्ध केला.) किंवा जगाला दहशतवादानं ओलीस धरता कामा नये आणि कट्टर धर्मांधता आणि हिंसा हे कॉकटेल जगासाठी विनाशकारी आहे. (त्यासाठी मी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी लिहिली) आणि अशा अनेक प्रश्नांचा साहित्यातून वेध घेऊन मी माझे लेखकिय नैतिक कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला आहे.
 साहित्य हे धर्म आणि विज्ञानाप्रमाणे सत्याचा शोध घेण्याचे साधन आहे, तद्वतच ज्या तीन मूल्यांद्वारे आधुनिक सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते, ती तीन मूल्ये म्हणजे विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद होय. प्रश्न विचारणे व बुद्धीच्या कसोटीवर पारखून कोणतीही गोष्ट स्वीकारणे म्हणजे विज्ञानवाद. सत्असतूची व नैतिक-अनैतिकतेची कसोटी लावून वागणं म्हणजे विवेकवाद. माणसानं माणसावर प्रेम करावं व एकमेकाला धरून राहावं आणि शांततामय सहअस्तित्व मान्य करीत जगावं म्हणजे मानवतावाद. या तिन्ही मूल्यांचं भरण-पोषण माणसाच्या मनात चांगल्या साहित्यानं होत! म्हणून साहित्याला या आशयाचे सामाजिक प्रयोजन आहे. मानवी संस्कृतीचा उद्देश हा मानवी कल्याण हा आहे व साहित्याचा पण तोच उद्देश आहे. ही माझी साहित्याची वाचन-चिंतन आणि प्रतिभेतून सिद्ध झालेली भूमिका आहे. त्या दृष्टीने आपण माझ्या साहित्याचे वाचन व समीक्षा केली तर मला आनंद होईल.


तीन
आजचे आपले अस्वस्थ वर्तमान


 जेव्हा साहित्यिक - कलावंत सद्य:स्थितीवर सत्ताधा-यांना न रुचणारं परखड भाष्य करतो किंवा एखाद्या चळवळीला समर्थन देतो आणि त्यात भाग घेतो, तेव्हा राजकीय माणसं - पक्ष कधी साळसूदपणे तर कधी छद्मीपणे विचारतात, 'तुम्ही तुमचं साहित्य-बिहित्य, लेखन-बिखन खुशाल करा, इथं कशाला लुडबूड करता ?'

१६ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन