पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्यांना आत्मबळ व आत्मभान द्यावे यासाठी एक साहित्य चळवळ उभारावी असं ठरवलं आणि ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स मुव्हमेंट' - प्रगतिशील लेखक चळवळीचा जाहिरनामा बनवला. तो सज्जाद जहिरनं मुन्शी प्रेमचंदांना भारतात आल्यावर दाखवला. त्यांना या जाहिरनाम्यातील लेखकाच्या उत्तरदायित्वाची भूमिका एवढी पटली की, त्यांनी तो हिंदीत अनुवाद करून आपल्या लोकप्रिय मासिक 'हंस' मध्ये छापला. त्यामुळे तत्कालीन भारतातील सर्व लेखक-कवींचं लक्ष वेधलं गेलं. या चळवळीचं प्रमुख तत्त्वज्ञान होतं, मानवी समता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं! 'प्रगतीवाद' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. १९ व्या शतकात इंग्लंडमध्ये वंचित, पीडित माणसांचे जीवनमान सुधारणं आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीनं सामाजिक सुधारणा घडवून आणणं म्हणजे प्रगतीवाद अशी विचारधारा प्रस्थापित झाली होती. मानवी विकासाच्या साच्या कक्षा ही प्रगतीवादी विचारधारा आपल्या कक्षेत घेते आणि शोषितांच्या दु:खांना वाचा फोडीत त्यांचा आवाज बुलंद करते व शोषकाविरुद्ध एल्गार पुकारते. साहित्याचे हे महत्त्वाचे काम आहे, असं या जाहिरनाम्यात म्हणलं होतं. त्याचीच अभिव्यक्ती प्रेमचंदांच्या वर उद्धृत केलेल्या भाषणात झालेली दिसते. आजही प्रेमचंदांनी मांडलेली विचारधारा भारतीय साहित्यात - खास करून हिंदी साहित्यातला एक प्रखर स्वर आहे.
 प्रगतीवादी लेखक चळवळीवर तत्कालीन सोव्हिएट युनियनच्या कलेबाबतच्या डाव्या मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होतो हे नि:संशय. वंचित, पीडितांचा व शोषितांचा साहित्यानं आबाज बनला पाहिजे, हे प्रगतिशील लेखक चळवळीच्या साहित्य विचाराचं सार आहे. निखाईल बुखारीन या समाजवादी साहित्य सिद्धान्तकानं असं म्हटलं आहे की, 'काव्यनिर्मिती (व एकूणच साहित्य निर्मिती) ही एकप्रकारे विचारधारेचे प्रगटीकरण असते. काव्य व साहित्य हा सामाजिक विकासातला एक महत्त्वपूर्ण घटक असतो. कारण सबंध जग हे सामाजिक विकासाचं प्रॉडक्ट असतं.' तर जॉर्ज ऑमसनच्या मते 'कलावंत हा श्रमकन्याचा प्रेषित असतो.' कला ही मानवजातीची गुलाम नाही की मालक, तर ती आहे मार्गदर्शक. अर्थातच कला ही कलावंताचा विवेक, अंत:करण व आवाज असते; पण त्याच बरोबर ती मानवजातीच्या सामुदायिक स्वर पण असते. कलेच्या उच्चतम अविष्काराने ती माणसांचे रूढी-परंपरांनी बनलेले भ्रम ध्वस्त करते आणि उदात्त ध्येय-कल्पनांचं भरण-पोषण करते. हाच कलेचा व कलावंत धर्म असला पाहिजे. विशेषत: त्यांचा, ज्यांना आपल्या बांधवांना गुलामी, रूढी व मागासलेपणातून दर करायचं आहे.

 या प्रगतिशील लेखक चळवळीच्या कला विचारांचा भारतीय साहित्यावर खोल प्रभाव पडलेला आहे. आजचं हिंदी काव्य व कथात्म साहित्य त्यांचे अनुसरण

१२ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन