पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रममाण होत लिहीत राहिले, तर अशा ‘बौद्धिक भांडवलदार' बनलेल्यांचा पण आपण निषेध केला पाहिजे....' प्रेमचंदांनी त्या काळच्या जागतिक लेखक संघाचा दाखला देत म्हटलं की, माणसांची सुख-दु:ख, त्यांचे आर्थिक प्रश्न, ऐतिहासिक वादविवाद, जीवनविषयक तत्त्वज्ञान आदी सर्व काही पाश्चात्त्य साहित्यात ताकदीने मांडले जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना उथळ व वरवरचं लिहिणा-या भारतीय लेखकांची लाज वाटते. त्यांचा भारतीय लेखकांना संदेश होता की, त्यांनी आपली सांस्कृतिक पातळी उंचावली पाहिजे. जर आपण आपली लेखन कला व साहित्य सेवा देशातील हजारो गरिबांच्या सेवेत झिजवली, तरच आपण आपलं लेखकाचे कर्तव्य पूर्ण केलं असं म्हणता येईल.
 प्रेमचंदांचं हे सूत्र पुढे नेत विचार करायचा म्हणलं तर, साहित्य ही केवळ फावल्या वेळाची केवळ करमणूकक नाही, तर बुद्धी, भावना आणि प्रतिभेच्या त्रिवेणी संगमातून घडवलेलं जीवनदर्शन असतं. ते वास्तवतेचं फोटोग्राफीप्रमाणे केवळ शब्दांनी केलेलं डॉक्युमेंटेशन नसतं तर, ते लेखकाच्या प्रतिभारूपी सप्तरंगातून रेखाटलेलं अंतरंग व्यक्त करणारं पेंटिंग-चित्र असतं. साहित्य हे समाजातून माणसाचं दुःख, शोषण, व्यथा-वेदना आणि समाज व्यवस्थेतलं त्याचं पिचलं जाणं आणि धर्म-राजकारण-सत्तेसोबतचा संघर्ष आदी जीवनद्रव्यं घेतो आणि आपल्या प्रतिभेनं त्याची पुनर्रचना करून समाजापुढे आरशासारखा ठेवतो. थोडक्यात साहित्य हे एका अर्थाने समाजाचं जीवनसत्व असतं आणि जो समाज हे सत्व जागरूकतेनं व नीरक्षीर विवेकी न्याय लावून टिपतो आणि मनात रूजवून घेत विचार करतो व प्रश्न विचारू लागतो, तो समाज निरोगी व प्रगतिशील राहतो. जेव्हा समाज आणि साहित्याची नाळ तुटते, तेव्हा असा समाज हा शबल, हतबल व एका अर्थानं करूप हात जातो. ही त्या समाजाच्या अध:पतनाची सुरुवात असते. कारण तो साहित्यातून संवेदनशीलता घेत नसल्यामुळे मूक-बधिर झालेला असतो. पण हीच वेळ असते व हाच काळ असतो, जेव्हा लेखकांनी-कलावंतांनी अधिक जबाबदारीनं लेखन करून समाजाचा आवाज बनावा, त्याचं आत्मभान जागृत करावं आणि त्याला दिलासा धावा की, त्याचे दु:ख, त्याचं शोषण एक ना एक दिवस संपणार आहे. म्हणजेच व्यापक अर्थाने साहित्य सामान्य माणसाची जीवनावरची श्रद्धा डळमळू न देता जिवंत ठेवतो.

 लंडनमध्ये १९३५ मध्ये मुल्कराज आनंद, एम. डी. तसीर, ज्योर्तिमय घोष, प्रमोद सेनगुप्ता आणि सज्जाद जहिर यांनी सामंतवाद, वसाहतवाद व साम्राज्यवादाविरुद्ध लेखक-कलावंतांनी ठाम भूमिका घेऊन लेखन करावं व समाजाच्या दबलेल्या-पिचलेल्या कामगार-शेतकरी व पददलितांच्या आणि दुय्यमत्वाचे जीणं व्यवस्थेमुळे जगावं लागणा-या स्त्रीच्या दु:ख-वेदनेला शब्द देऊन

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ११