पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


माध्यमातून प्रकट करीत दु:ख-वेदनेशी संघर्ष करणा-या त्याच्या विजिगीषु वृत्तीला बळ देणं, ही माझ्या लेखकाची सर्वात प्रबळ प्रेरणा आहे, असं मी मानतो.
 आज एकविसाव्या शतकातलं जग स्फोटक बनलं आहे. गरिबी, मूल्यांचा हास, दहशतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल का, व त्याचा जगण्याचा विश्वास अंशमानाने का होईना वाढवता येईल का, हा माझा सततचा प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक, बेकारी आणि आत्महत्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे. तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचं मी सातत्यानं भान बाळगत आलो. तसेच हॅव नॉट' म्हणजेच 'नाही रे' वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे ही पण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे. तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र, त्यासाठी कोणताही एक 'इझम' वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे, असे मी मानत नाही. माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे.

 मी स्वत:ला आजच्या काळाचा म्हणजेच समकालीन लेखक मानतो. जेव्हा टीकाकार मला समकालीन लेखक म्हणतात, ती माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लिमेंट आहे, असे मी मानतो. हे माझ्यासाठी सहजतेनं घडत गेलं असं वाटतं. मराठी वाचकांना पुराण-इतिहासात रमायला आवडतं. राजकीय नेते हे जाणून मतपेटीसाठी 'पुनरुज्जीवनवादाला उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या काळचे व त्या काळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे 'पोलिटिकली करेक्ट' लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाची प्रकार म्हणजे 'नॉस्टॅल्जिक' होत गेलेल्या लेखनाचा. मला वाटतं की, मराठी माणूस अजूनही भूतकाळात जास्त रमतो; पण माझी स्मरणरंजनाची व इतिहास-पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसेच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही. ख-या अर्थाने वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस वे एक लेखक आहे. इथं कदाचित एक धोका माझ्यासारखा समकालीन लेखकाबाबत उद्भवतो. तो हो की उद्या हे साहित्य शिळे तर होणार नाहीं? माझं उत्तर साफ आहे, कालिदास, शेक्सपिअर, प्रेमचंद व मंटोसारखे कालजयी लेख़क पण किती वाचले जातात? त्यामुळे भविष्यकाळातील वाचकाची मी बिलकूल चिंता करीत नाही. आज जो माझ्या भवतालचा समाज आहे, माणसं आहेत, त्यांच्यात मी गुंतलेला असतो. लेखक म्हणून तसेच कलावंत म्हणून, त्यांच्या खासगी जीवनावविषयी मला

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ९