पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिक संपन्न व्हावी अशी त्या काळी जी अपेक्षा व्यक्त केली, त्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ लोटला असला तरी आपली मराठी किती प्रमाणात ज्ञानभाषा झाली आहे, याचे आपण साऱ्यांनी गांभीर्याने आत्मपरिक्षण केले पाहिजे. महाराजांचे हे भाषण प्रमाण मानून आपण साऱ्यांनी या दिशेने अधिक भरीव प्रयत्न केले पाहिजेत, हे नक्की!
 बडोद्याशी संबंधित संमेलनाध्यक्षपद भूषवलेले सयाजीराव गायकवाड आणि न. चिं. केळकरांच्या पंक्तीला बसण्याची माझी पात्रता नाही हे मी जाणतो. हे दोनच नाहीत तर अनेक दिग्गजांनी भूषवलेल्या संमेलनाध्यक्ष पदावर माझी निवड करून माझा जो बहुमान मराठी रसिकजनांनी केला आहे, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. तसेच माझ्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. त्या जाणिवेतून आता मी माझे साहित्यचिंतन व भविष्यकाळात करावयाची कामे यावर माझे विचार नम्रतेने आपणासारख्या रसिक जाणकार श्रोत्यांपुढे मांडणार आहे.


दोन
माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन


 मित्रहो, मूलत: मी एक सर्जनशील ललित लेखक आहे. कथा व कादंबरी हे माझं अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम आहे. त्यामुळे माझं साहित्यविषयक चिंतन आपणापुढे मांडताना मी माझ्या लेखनाच्या प्रेरणा काय आहेत आणि मला काय व्यक्त करायचे होते व आहे ते प्रथम प्रस्तुत करतो.

 आत्माविष्कार ही कलावंतांच्या कलेची पहिली व अखेरची प्रेरणा असते; पण कलावंत हा समाजाचा जबाबदार घटक असतो आणि आपल्या काळाचं 'प्रॉडक्ट किंवा अपत्य असतो. त्यामुळे त्याची कलाप्रेरणा केवळ मनाचा आविष्कार नसते, तर समाजातील माणसांच्या सुखदुःखाची, संघर्ष लढ्याची हकिकत प्रत्यक्षअप्रत्यक्ष कृतीद्वारे किंवा सहानुभूतीने जाणून घेऊन ती व्यक्त करणे व माणसाच्या जगण्याला बळ देणे, त्याला प्रसंगी पेटवणं तर कधी रिझवणं अशा पद्धतीने आपल्या प्राप्त व विकसित झालेल्या प्रतिभारंगात मिसळून व्यक्त होते. मी स्वत:ला सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ सदैव माणसाच्या दु:खवेदनेशी जोडलेली गेलीय असं वाटतं. खरं तर टॉलस्टॉयनं म्हटल्याप्रमाणे सुखाच्या-आनंदाच्या कहाण्या फार तर एक दोन होतील; पण दु:ख, वेदना आणि संघर्षाच्या शेकडो कथा होऊ शकतात. मला तर प्रत्येक माणसाचं दु:ख, संघर्ष हा माझ्या लेखनाचा कच्चा माल वाटतो. अशा माणसाचं अंतरंग प्रतिभा, स्वानुभव, चिंतन आणि मनन करून जाणणं व शब्दाच्या

८ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन