पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यापेक्षा अधिक वेगळे व नवे उपक्रम होताना दिसत नाहीत. महाराजांनी त्या काळी मराठी भाषा व वाङ्मयासाठी जे काम केले ते आज आपले सरकार किती व कसे करीत आहे, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर उत्तर फारसे समाधानकारक मिळणार नाही हे उघड आहे. यातच महाराजांचे थोरपण दिसून येते आणि आजच्या आपल्या सरकारचे अपयश व आपले मराठी भाषिक म्हणून होणारे दुर्लक्ष दिसून येते. असो. पण या गुजराथच्या भूमीवर मला गुजराथ सरकार व जनतेला हे सांगू द्या, की महाराजांचे संस्थान हे मराठी असले तरी त्यांनी मराठी बरोबर गुजराथी भाषा व वाङ्मयाच्या वाढीसाठी त्या काळी तरतमभाव न बाळगता काम केले. त्यांच्यामुळे निर्माण झालेला मराठी-गुजराथी भाषाबंध आपण या पुढेही तसाच जपला पाहिजे व अधिक दृढ केला पाहिजे.
 या भाषणाच्या शेवटी महाराजांनी मराठी वाङ्मय परिषद व साहित्यकारांना काही मौलिक सूचना केल्या, त्या अशा होत्या.

“१)  लोकांस सुविचार व सद्भावनापोषक असे वाङ्मय हवे आहे. ज्ञानाने व अंत:करणाने आपले लोक सुधारलेल्या देशातल्या सारखे संपन्न होतील. आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहतील; राष्ट्रैक्याच्या व बंधुत्वाच्या कल्पनांचे बीजारोपण लोकांत होईल आणि अशा रीतीने एक राष्ट्ररचनेस प्रारंभ करीत अशाच प्रकारचे वाङ्मय निर्माण करण्याकडे लेखकांनी लक्ष द्यावे व ते प्रकाशित करण्याचे काम साहित्य परिषदेने हाती घ्यावे.

२) पाश्चात्त्य लेखक व विचारवंतांचे तसेच अर्थशास्त्र, नीती, राजकारण, विद्युतशास्त्र यांसारखी शाखे, स्थापत्य, चित्र वगैरे कला यांवरील अभिज्ञ ग्रंथकारांच्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे करविणे हे स्वभाषाअभिमानी व राष्ट्राभिमानी विद्वानांचे कर्तव्य आहे.

३) पाश्चात्त्य संदर्भ ग्रंथांवर 'देशीकार लेणे' चढविणे किंवा त्यांच्या धर्तीवर स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करणे जरूरी आहे.

४) लेखकांनी संस्कृतप्रचुर अवघड भाषेत न लिहिता खेडवळांनाही समजेल अशा सरळ भाषेत लिहिण्याचा परिपाठ ठेवावा.

५) ज्या पुस्तकांनी विचारात क्रांती घडवून आणली असेल, त्यांची भाषांतरे स्वभाषेत व्हावीत. स्वतंत्र लेखन करण्यासारखी प्रतिभा नसेल, त्यांनी चांगली भाषांतरे करण्याकडे लक्ष द्यावे."

 श्रोते हो, महाराजांनी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि राष्ट्रैक्य व बंधुतेच्या कल्पनांचे बीजारोपण व्हावे, संदर्भ ग्रंथ विपुल निर्माण व्हावेत व उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर होऊन मराठी

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ७