पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

नेसवीन ग तुला.' शेवटी एकदाचा निकाल आला. पोराला लागण नव्हती. आपल्यामुळे त्याच्या वाट्याला नको हे असलं काही. आपल्या ताटात खाल्ल्यामुळे त्याला काही होईल का? मनात शंका आहे तर परत त्या काउन्सिलरला भेटून आलं पाहिजे. काउन्सिलरकडे जायचं का कामावर जायचं? अजून किती खाडे करणार?

  हॉस्पिटलात अॅडमिट झाल्यापासून सम्या फिरकला नव्हता. बारक्याकडून निरोप पाठवला तेव्हा त्यानी बारक्याच्या हाती ५०० रु. पाठवले. तो मात्र आलाच नाही, लोकांना संशय येईल म्हणून. आग लागो त्याला. नुसती रात्रीला आठवण येते भाड्याला. त्याच्याकडूनच आला असणार. दुसरं कोण? ताडकन उठून बसल्या. बारक्याने झोपेत चुळबुळ केली आणि परत झोपला. सम्याकडूनच आला असणार. रागानी अंग कापत होतं. मनातल्या मनात त्यांनी सम्याला खूप शिव्या दिल्या. पण असं कसं झालं?... एवढा धडधाकट, देखणा. विचार करताना स्वत:चे ओठ चावत होत्या. एकदम हुंदका दिला. परत रडू येणार असं वाटायला लागलं. झोपेत बारक्या कुशीवर वळला. ताईंनी एकदम स्वत:ला आवरलं. बस! बारक्या जवळ असताना रडायचं नाही. सम्यानी निरोध वापरला असता तर? ती पलीकडच्या गल्लीतील निमी एका सामाजिक संस्थेतर्फे फुकट निरोध वाटते, तरीसुद्धा तिच्याकडून घेतले नाहीत. आता काय करणार? आपलं नशीब... डोक्याला हात लावून खूप वेळ तशाच बसल्या. मोठा श्वास घेतला. मनाशी पक्की गाठ बांधली. जे काही करायला लागेल ते करू, पण बारक्याला मोठा झालेला बघायचाय. त्याचं एकदा लगीन लागलं म्हणजे झालं. मग आपलं काहीही होऊ दे. वळून त्यांनी बारक्याच्या डोक्याचा मुका घेतला. परत तोच विचार, 'असा मुका घेतल्याने त्याला काही होणार नाही ना?'

 "नाही ताई, त्यानी तुमच्या ताटात जेवल्यानी, अगदी त्याच्या ओठांचा मुका घेतल्यानीसुध्दा त्याला लागण होणार नाही. मनातली भीती काढून टाका" काउन्सिलरनी धीर देत सांगितलं. हे ऐकून जिवात