पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नका" असं निक्षून सांगितलं.

 तिसऱ्या महिन्यापासून गोळ्यांचा त्रास कमी जाणवू लागला. थकवा जरा कमी झाला, पाळीचं चक्र लायनीवर आलं. वजन २ किलोनी वाढलं. काळजी होती गोळी चुकू नये याची. एकदा मोबाइल रिचार्ज करायला विसरल्या, पण बातम्यांनी आठवण करून दिली. एकदा दिवे गेले होते पण मोबाइलच्या अलार्मने आठवण करून दिली. किती ठरवलं तरी आयत्या वेळी काही ना काही अडचणी येत होत्या.

 निमीचा वाढदिवस होता. तिने मंगलताईंना जेवायला बोलवलं. निमी कोती (ट्रान्सजेंडर-'टीजी') असल्यामुळे ओळखीच्या अनेक कोत्या, पंती, जोगते, हिजडे, तिच्या वाढदिवसाला आले होते. सर्वांशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलं नाही. बोलता बोलता कोणीतरी म्हणालं, "सम्या हॉस्पिटलात आहे" "काय झालं?" ताईंनी सहज विचारल्यासारखं विचारलं पण मनात धस्स झालं होतं. "काय माहिती", ताईंना जास्त काही विचारायचं धैर्य झालं नाही, पण मन विचलित झालं. जेव्हा घड्याळाकडे लक्ष गेलं, तेव्हा लक्षात आलं, की गोळी घ्यायची वेळ होऊन गेली. मोबाईलचा अलार्म का नाही झाला? अरे देवा, मोबाइल घरी राहिला वाटतं. ताई झटदिशी उठल्या, 'आले' म्हणाल्या, भोरीत गेल्या, पोलक्यात ठेवलेला बटवा काढला, गोळी काढली, गिळली, बाहेर आल्या. पाणी पिल्या. त्यांनी गोळी घेतली हे कोणाला कळलंही नाही. एव्हाना ताईंना सहजपणे इतरांचे डोळे चुकवून गोळी घ्यायची सवय झाली होती. ६ महिन्यांनी सीडी-फोरची चाचणी केली. सीडी-फोर वाढून ४२५वर आला होता. टीबी बरा झाला. त्याची डॉट्सची औषधं संपली. टीबीची पिडा गेल्यानंही मन हलकं वाटत होतं.