पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७. दररोज व ठरलेल्या वेळी सांगितलेल्या गोळ्या घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक दिवस जरी या गोळ्या घ्यायच्या राहून गेल्या तरी ही संजीवनी व्यर्थ जाऊ शकते."

 दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. रक्तात लोहाचे प्रमाण फार कमी होते. म्हणून हिमोग्लोबिन वाढवायचं औषध दिलं व 'एस+एल+एन' एआरटी औषधं सुरू केली. पहिल्यांदा १५ दिवसांच्या गोळ्या दिल्या. औषधं सुरू झाल्यावर ती कशी काम करतात हे जाणून घेण्यासाठी १५ दिवसांनी परत तपासण्यासाठी बोलावलं.

 म्हणजे आता डॉट्सच्या गोळ्या आणि याही गोळ्या. ताईंना शीण आला होता. सम्याची आठवण आली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून पडून राहावं असं वाटलं. किती महिने, नाही वर्ष झाली, कोणाशीही संग झाला नव्हता. शरीर स्पर्शासाठी उपाशी होतं. सम्या त्यांना शिव्या देऊन गेल्यापास्नं परत त्याच्याशी कधी बोलणं झालं नव्हतं. अधूनमधून गल्लीत दिसायचा, पण ओळख दयायचा नाही. ओळख दयायला शुद्धीवर असायला पाहिजे. दररोज पिणं सुरू झालं होतं. दारू पिऊन झोकांड्या देत, येणाऱ्या-जाणाऱ्याला शिव्या देताना दिसायचा.

 डॉक्टर डॉट्सची आठवड्याची औषधं देऊ लागले होते. घरी गोळ्या घ्यायच्या व पुढच्या आठवड्यात रिकामं पाकिट परत करून दुसरं पाकिट घ्यायचं. गोळी घ्यायची म्हटलं, की अंगावर काटा यायचा. गोळी घ्यायची वेळ जवळ आली, की लगेच मळमळायला व्हायचं, पण थोडा फरक दिसू लागला होता. खोकला कमी झाला होता. रात्रीची झोप लागत होती. मासिक पाळी मात्र बिनसली होती. कामावर जाताना थकवा मात्र खूप जाणवत होता.

  गोळी घेणं जीवावर यायचं; पण काउन्सिलरने स्पष्ट सांगितलं होतं,