पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डॉट्सच्या गोळ्या सुरू करतेवेळी काउन्सिलरनी ताबडतोब एआरटी साठी रजिस्टर करण्यास सांगितलं. डॉक्टर म्हणाले, "डॉट्सच्या गोळ्या घेऊन पंधरा दिवस झाले, की एआरटी औषधं सुरू करायची.'

 औषधांची वेळ आली कळल्यावर मन एकदम खचलं. इतके दिवस या औषधांवाचून सगळं चालू होतं. आपण स्वावलंबी होतो. आता या औषधांवर विसंबून राहायचं हे जाणून घाबरायला झालं. असुरक्षित वाटायला लागलं.

 मंगलताईंनी काउन्सिलरच्या सांगण्याप्रमाणे एचआयव्ही औषधांसाठी नावनोंदणी केली. नावनोंदणी करतेवेळी निमीला घेऊन बरोबर रेशनकार्ड, दोन फोटो, एचआयव्ही रिपोर्ट व सीडी-फोरचा रिपोर्ट घेऊन गेल्या. एआरटी सेंटरमध्ये नावनोंदणी क्रमांक मिळाला.

  दुसऱ्या दिवशी ताईंनी ८०० रुपयांचा जुना वापरलेला मोबाइल विकत घेतला. बारक्यालाही स्वत:चा एक मोबाइल हवा होता. त्याला सांगितलं, "परीक्षेत पास झालास की देईन." बारक्या नाराज झाला, म्हणाला, "परीक्षेला अजून अवकाश आहे. माझे वर्कशॉपचे पैसे मला दे, त्या पैशाचं मी पाहिजे ते करीन." याच्यावरून भांडण झालं. पोरगा हाताबाहेर चाललाय याची चाहूल मंगलताईंना लागली.

 औषधं सुरू करण्याअगोदर रक्ताच्या काही तपासण्या, सोनोग्राफी केली.

 ग्रुप काउन्सिलिंगची तारीख मिळाली. ग्रुप काउन्सिलिंग झालं. या विषयावरचा एक चित्रपट दाखवला. तो चित्रपट एवढा मोठा होता, की बघता बघता पेंग आली. जाग आली तेव्हा काउन्सिलर ताई बोलत होत्या-

 पूर्वी एचआयव्हीची वाढ रोखण्यासाठी औषधं नव्हती. आता अनेक औषधं उपलब्ध आहेत. या औषधांना एआरटी म्हणतात. ही एआरटी औषधं आपली संजीवनी आहे. एआरटी औषध नियमित, न चुकता घेऊन एचआयव्ही नियंत्रणात ठेवता येतो.