पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या रात्री मंगलताईंना नीट झोप लागली. झोपताना मात्र मनात विचार आला- निमीनं आज समजून घेतलं, पण उद्या हिच्याशी भांडणबिंडण झालं तर? मग ती या माहितीचा कसा वापर करेल? पण निमी सरळ चालीची होती. आपण बरं आणि आपलं बरं. ती कोणाला नाही सांगायची. या विचारातच कधी झोप लागली कळलं नाही. सकाळी उठल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं. जणूकाही आपल्या ओझ्याला कोणाचातरी आधार मिळाला आहे.

 पुढे काही दिवस हा विषय ताईंनी कोणापाशीही काढला नाही. पण मग एक दिवस राहावलं नाही. रविवारचा दिवस होता. बारक्याला "शेजारी जाऊन येते" सांगून ताई शेजारणीकडे गेल्या. शेजारणीला सांगितलं. तिला वाईट वाटलं. तिचा चेहरा उतरला. तिला सांगायचं एक महत्त्वाचं कारण होतं. ते ताईंनी बोलून दाखवलं. "यावर काही औषध नाही का हो?" शेजारीण म्हणाली, "विषयच निघाला म्हणून सांगते, आमच्या गावाकडे एकजण आहे. तो हा आजार खात्रीने बरा करतो. तिथं का नाही जात? माझ्या नातेवाइकाच्या ओळखीचे एकजण ठणठणीत बरे झाले." मंगलताईंच्या मनात एकदम आशेचा अंकुर फुटला. "काय खर्च येतो?" "मी विचारते, मला वाटतं दहा-पंधरा हजार रुपये येतो." मंगलताई एकदम शांत झाल्या. कुठून आणायचे एवढे पैसे? शेजारीण सांगत होती, "तो तीन महिन्यांसाठी कसलंतरी औषध देतो. त्यानं वजन पण वाढतं, काळजी करू नका, शंका घेऊ नका. विश्वास ठेवा. सर्व ठीक होईल."

 काय करायचं असा विचार करत करत दोन-तीन महिने गेले. शेवटी, मंगळसूत्र, कानातलं काय कामाचं? असा विचार करून ती मोडली, पितळाच्या वाट्या गळ्यात घातल्या आणि एस.टी.करून बारक्यासंग जाऊन त्या बाबाकडून औषध घेतलं. औषध नेमानं घ्यायला लागल्या. सीडी-फोर करायची तारीख