पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हो नाही हो नाही म्हणता शेवटी सांगितलं. तीन-साडेतीन महिने विचार करण्यात गेले. कुणालातरी सांगावंसं मनापासून वाटत होतं. काउन्सिलरशी बोलणं होत होतं पण तिथं खूप गर्दी होती. मोकळेपणानं बोलता येत नव्हतं. मन मात्र भडभडून मोकळं होण्यास त्रासलं होतं. आता सांगायचंच असं ठरवून, शेजारीण एकटी असताना, मंगलताई तिच्यापाशी गेल्या होत्या, पण बोलायच्या वेळी छाती इतकी धडधड करायला लागली, की त्यांनी पाय मागे घेतला. दुसऱ्यांदा गेल्या, तेव्हा शेजारणीचंच गा-हाणं ऐकायला लागलं. तिला मूल नाही म्हणून नवरा तिला त्रास देत होता. अशावेळी आपलं गाहाणं कसं मांडायचं म्हणून विषय काढला नाही. कसं सांगावं? मनात सारखी भीती. शेजारची गावभर सांगेल का? तिची आपल्याशी वागणूक बदलेल का? काय करावं सुचत नव्हतं. भावाला सांगावं का? पण तो बाहेरगावी होता. त्याला सांगून तरी त्याचा काय आधार मिळणार?

 असं तळ्यात मळ्यात करता करता एक दिवस राहावलं नाही. बारक्याचा वार्षिक निकाल होता. पोरगा पास झाला होता, पण गेल्या वर्षाची फी भरल्याशिवाय शाळा निकाल देत नव्हती. म्हणून "मी फी भरते, या महिन्याची भिशी तू माझ्यातर्फे भर" म्हणून निमीला सांगायला गेल्या आणि एकदम रडू अनावर झालं. "अगं काय झालं' म्हणून निमीनं जवळ घेतलं. ओक्साबोक्शी रडत त्यांनी सांगितलं. मनात धास्ती होती, की सांगितल्यावर ती लगेच मागे सरेल, पण तसं झालं नाही. ताईंना रडू दिलं, मग निमीनं ताईंचे डोळे पुसले. मंगलताईंनी निमीचे हात घट्ट धरले. "कृपाकरून कोणाला सांगू नकोस, पाया पडते मी". "नाही हो, एवढा विश्वास ठेवलात ना माझ्यावर, तो मोडणार नाही" निमी म्हणाली. ताई म्हणाल्या "एवढं जग पुढं गेलंय, हा आजार बरा व्हायला काही औषध नाही का?" निमी नकारार्थी मान हलवत म्हणाली, आजार बरा करणारं कोणतंही औषध नाही, पण त्याला आळा घालायला एआरटी औषधं आहेत." ताई काहीच बोलल्या नाहीत.