पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

 दोन तीन वर्षांपूर्वी काही एक कारणानें ह्या संगीताची कल्पना माझ्या मनांत उद्भवून तदनुसार श्रीमहाकवि कालिदास यांच्या अभीज्ञान शकुन्तलाच्या चार अंकांचें भाषांतर संगीतांत केलें व त्यास योग्य अशी मंडळी अनुकूल झाल्यानें त्याचा रंगभूमीवर प्रयोगही करून दाखविला; तो रसिकजनांस मान्य झाला असें वाटल्यावरून दुसरे वर्षीं त्या नाटकाच्या पुढच्या तीन अंकांचिही भाषांतर करून, तो ग्रंथ संपवून सर्व प्रयोग आमच्या मित्रमंडळीच्या दृष्टीसमोर आणला. आतां या तिसऱ्या वर्षी आमच्या आर्यबंधूंची सेवा करण्यास कोणतें साधन मिळवावें या विवंतनेंत असतां दुसरीं प्राचीन नाटकें पुष्कळ पुढें येऊन उभीं राहिलीं. परंतु आपल्यापाशीं अनुकूल असलेल्या मंडळीकडे पहातां तीं सर्व नाटके माझ्या दृष्टीनें असाध्यशीं वाटूं लागलीं. या कारणामुळें आपल्या पुराणांतील एखादा इतिहास घेऊन त्यावर स्वकपोलकल्पित नाटकाची रचना करून हे वर्ष साजरें करावें, असा विचार मनांत ठसला. नंतर तसे इतिहास पुष्कळ मनांत येऊन हा अर्जुन-