पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण एका निर्जीव अजस्त्र यंत्रणेचे गुलाम बनलो आहोत अशी ही सार्वत्रिक अगतिकता होती आणि 'कम्युन्स' हा या अगतिकतेचा विधायक उद्रेक होता. हुकुमशाहीमध्ये--मग ती डावी असो की उजवी असो-- ही अगतिकतेची, परकेपणाची भावना पराकोटीला पोचते, म्हणून तेथील उद्रेकांचे स्वरूपही जहाल रहाते. परंतु लोकशाही देशातही सर्वसामान्य नागरिकाला हा स्वयंशासनाचा प्रत्यय येईनासा झाला असल्याने तेथील जनतेत अराजकाचे आकर्षण वाढीस लागले आहे. फ्रान्समधील उठावाच्या कितीतरी अगोदर इंग्लंडमधील विचारवंत 'लोकशाहीचा साचा बदला, नाहीतर ती टिकणार नाही, असे प्रतिपादन करू लागले होते. आजच्या मजूर मंत्रिमंडळातील एक मंत्री, प्रख्यात मजूर नेते वेजवुड बेन यांनी शासनकर्ते, शासनव्यवस्था आणि जनता यांच्यामधील दुरावा हेच फ्रान्समधील उद्रेकाचे कारण आहे असे सांगून इंग्लंडमध्येही लोकशाही व्यवस्थेत काही मूलगामी बदल केले नाहीत, सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या निर्णयात सहभागी होण्याची संधी आपण प्राप्त करून दिली नाही, तर परिस्थिती असुरक्षित आहे असा आपल्या सहकाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. अमेरिकेतील परिस्थिती तर याहीपेक्षा असुरक्षित आहे. 'Wanted : Relevance and Involvement-' (संदर्भ हवा, नाते हुवे) अशी तिकडची मागणी आहे. मॅनहॅटनचे प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठ नुकतेच काही काळ विद्यार्थ्यांच्या ताब्यात होते.

लोकशाहीच्या माहेरघरात हे धक्के जाणवत असताना आपल्या नकली लोकशाहीतले मोरारजींसारखे नेते जेव्हा 'तसे काही हिंदुस्थानात घडणार नाही' म्हणत डोळ्यावर कातडे ओढून घेतात, तेव्हा या मनःशांतीचे कौतुक वाटल्यावाचून रहात नाही.

आणि मिरजकर जेव्हा आपल्या राज्यकर्त्यांना पॅरीसचे इशारे देतात तेव्हा आपली क्रांतीही किती नकली आणि अनुकरणग्रस्त आहे याचा नकळत ते एक पुरावा देऊन जातात, असेही जाणवल्यावाचून रहात नाही.

स्वयंशासनाचा आग्रह हा तर आपल्याकडील ग्रामराज्यकल्पनेचा मुख्य आशय नाही का ?

*


जून १९६८

। ९१ ।