पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठिकाणी म्हटले आहे की, भूमीचा प्रश्न सुटल्याशिवाय हिंदुस्थानचे-सर्वच मागास लेल्या देशांचे-कुठलेच प्रश्न सुटू शकणार नाहीत. विनोबांनी हा मूलभूत भूमिप्रश्न हाती घेतला. भूमिहीनांच्या प्रश्नांकडे साऱ्या देशाचे लक्ष वेधले. खऱ्या अर्थाने भारतीय मजूरचळवळीचा पाया घातला. कारण आजही वर्षातून सहा महिने अर्धपोटी आणि वर्षभर अर्धवस्त्र असणारा आपल्याकडील आदिवासी-हरिजनभूमिहीन हाच मजूरसमाजाचा खरा तळ आहे आणि तो विनोबांनी ढवळून काढला आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीच्या तेलंगण लढ्याने आणि कालपरवाच्या नक्षलबारी उठावाने तरी यापेक्षा अधिक काय साधले आहे? हे दोन्ही उठाव व्यावहारिक अर्थाने तर पूर्ण फसलेलेच आहेत. तरीही भूमिहीनांचे लढे म्हणून माक्र्सवादी त्याकडे पाहतात. तसेच विनोबांच्या आंदोलनाकडे पाहिले गेले असते तर येथल्या परिस्थितीशी मिळता-जुळता असा एखादा नवा पर्याय पुढे येण्याची शक्यता होती. मी.

'भूदान प्रयोग यशस्वी ठरला असता तर माक्र्सवाद्यांना आनंद वाटला असता. पण तरीही तो उचलून धरून यशस्वी करावा असे त्याचे मोल अजूनही पटत नाही.' विद्यार्थी.

कोणाला त्याचे मोल पटो, न पटो मला मात्र फ्रान्समधील कम्युन्सच्या प्रेरणा आणि आपल्याकडील गांधी-विनोबांच्या ग्रामराज्यप्रेरणा यामध्ये समानतेचे एक सूत्र सारख जाणवत आहे. 'समाईक मालकी' ही आज फ्रान्समध्ये उगवलेल्या व काही दिवसातच मावळणाऱ्या ' कम्युन्स' मागील प्रेरणा आहे असे मला वाटत नाही. तशी समाईक मालकीची व्यवस्था तर इस्राईलमध्ये 'किबुत्स' च्या रूपाने आजही अस्तित्वात आहे व तिथे ती चांगली स्थिरपदही झालेली आहे. फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांनी व कामगारांनी स्थापन केलेली 'कम्युन्स' ही समाईक मालकीच्या तत्त्वापेक्षाही स्वयंशासनाचा आग्रह व्यक्त करण्यासाठी स्थापन केली असावीत, असे मला वाटते. 'आमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय आजच्या समाजव्यवस्थेत आम्हाला न कळत, आमच्यापासून फार दूर असणाऱ्या व्यक्तींकडून व यंत्रणेकडून घेतले जात आहेत. ही निर्णयव्यवस्था त्यामुळे आम्हाला परकी व निर्जीव वाटत आहे. या निर्णयव्यवस्थेत आमचाही काही वाटा, काही सहभाग असल्याशिवाय आम्हाला ती आपलीशी व जिवंत वाटणार नाही,' ही तेथील विद्यार्थीवर्गाची व्यथा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ दंगली माजवून स्वस्थ न रहाता शिक्षणसंस्थातून आपला कारभार सुरू केला, कामगारांनी संपाच्या पलीकडे जाऊन कारखान्याचा यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हे खाजगी मालकीच्या कारखान्यात घडल तसेच समाजवादाचे बालेकिल्ले असणाऱ्या सरकारी मालकीच्या कारखान्यात घडले. फ्रान्स-जर्मनी या भांडवलशाही देशात जशी ही प्रवृत्ती उफाळून वर आले तशीच ती युगोस्लाव्हिया, झेकोस्लोव्हाकिया या कम्युनिस्ट देशातही व्यक्त झाली.

। ९० ।