पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचे संबंध, विद्यापीठांचे समाजातील स्थान, संस्कृती आणि भांडवलशाही-अशा गंभीर विषयांवरही ही खवळलेली मुले रात्ररात्र जागून विचारविनिमय करीत होती. जिन पॉल सार्त्रसारखे लेखक, मोनोडसारखे नोबल पारितोषिक विजेते कधी स्वतः उपस्थित राहून, कधी पत्रके प्रसिद्ध करून या विद्यार्थ्यांना 'आगे बढो' म्हणून सांगत. सोरबोन विद्यापीठाच्या सभागृहात, उसळणाऱ्या विद्यार्थी-श्रोत्यांच्या सभेत भाषण करणाना सार्त्र ‘डॅनी दि रेड' ला उद्देशून म्हणाले होते- 'तुझ्यातून असे काही बाहेर फेकले गेले आहे की, ते झपाटून टाकणारे आहे, आश्चर्य करायला लावणारे आहे. जे जे म्हणून आज या समाजव्यवस्थेत मान्यता पावलेले आहे ते ते तुझ्यातील ‘त्या'मुळे झुगारले जात आहे. शक्यतेच्या मर्यादा तुझ्यामुळे विस्तारत आहेत. हे अर्धवट सोडू नकोस'...

संघटित पक्षाचे आणि त्यांच्या नेत्यांचे डोळे आता हळूहळू उघडत होते पोलिसांच्या अत्याचारामुळे सर्वसामान्य फ्रेंच नागरीक विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखविण्यासाठी आसुसला होता. आता जागलो नाही तर 'क्रांती' ची आपली बस चुकेल, आपल्याला बाजूस फेकून ही लोकगंगा कदाचित् पुढे उसळत निघून जाईल या भयाने आता सगळेच पक्ष, सगळ्या संघटना-डाव्या, अतिडाव्या, अधल्या-मधल्या-अहमहमिकेने पुढे सरसावल्या. १३ मेला पॅरीस शहरातून पाच लाखांचा प्रचंड मोर्चा निघाला. त्यात हे सगळे पक्ष, सर्व संघटना सामील झाल्या होत्या. यात मेंडेस फ्रान्स होते, मिटेरँड होते, वॉल्डॅक रोचेट होते, काही गॉलवादीही होते. पण गाजत गर्जत होते, डरकाळ्या फोडीत चालले होते. विशी-पंचविशितले नवे चित्ते, नवे छावे. चाळीस चाळीसच्या रांगात, हातात काळे, लाल, दुरंगी, तिरंगी-सर्व प्रकारचे झेंडे नाचवीत, International हे प्रसिद्ध क्रांतिगीत गातगात, मुठी फेकीत, 'गॉल चालते व्हा, म्युझियममध्ये बसा' अशा घोषणा देत ही अक्राळविक्राळ लोकगंगा जेव्हा पॅरीसच्या राजपथावरून फेसाळत-फुसाटत धावू लागली तेव्हा दोनशे वर्षापूर्वीच्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिवसांची जाणत्यांना आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. कुठल्याच जुन्या साच्यात ही क्रांती, हा उठाव बसू शकत नव्हता, कुठल्याच क्रांतिशास्त्राचा याला आधार सापडत नव्हता. सारेच नवे, सारेच उन्मादक - 'Youngest, most dynamic' - 'अत्यंत जोषपूर्ण अत्यंत वेगवान' अशी या मोर्च्याची वृत्तपत्रांतून वर्णने झळकली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच पॅरीस शहराला असा चैतन्याचा स्पर्श होत होता. पाच लाखांचा मोर्चा पाच तास सतत वहात होता, एकही पोलीस बंदोबस्तासाठी ठेवला गेला नव्हता, तरीही अनुचित प्रकार घडला नाही याची सर्व निरीक्षकांनी आवर्जून नोंद केली आहे.

। ८४ ।