पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येथील कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेने, एका प्रख्यात कम्युनिस्ट नेत्याला भाषणासाठी नाँतेरला पाचारण केले असता, या बावीस मार्चवाल्यांनी आरडाओरडा करून त्याचे भाषण बंद पाडले व आपण डाव्यातीलही डावे आहोत हे सिद्ध केले. नाँतेरचे महापौर कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. त्यांच्या सल्ल्यावरूनच या बावीस मार्चवाल्या निदर्शकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला व परिस्थिती चिघळत गेली अशी वस्तुस्थिती आहे. कम्युनिस्ट विद्यार्थीसंघटनांचे प्रमुख व कम्युनिस्ट वृत्तपत्रे आपल्या अनुयायांना या बावीस मार्चवाल्यांपासून लांब राहण्याचे आदेश वारंवार देत होते हेही ध्यानात घेण्यासारखे आहे.

'ऑक्सिडेंट' नावाची उजव्या गटाची विद्यार्थी संघटनाही नाँतेरमध्ये अस्तित्वात होती व या ऑक्सिडेंटवाल्यांच्या आणि वावीस मार्चवाल्यांच्या मधूनमधून चकमकीही झडत असत. मे महिन्याच्या दोन तारखेला बावीस मार्चवाल्यांनी 'साम्राज्यवाद विरोध दिन' साजरा केला. परिस्थिती थोडीशी तंग झाली. कॉलेज अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन वातावरण शांत करण्याऐवजी सूडबुद्धीने कॉलेजच बंद करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा जवळ आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा वर्षाचा प्रश्न होता. अशा मोक्याच्या वेळी कॉलेज अधिकाऱ्यांनी आपली कोंडी करून आपल्याला शरण आणण्याचे ठरविले आहे अशी भावना विद्यार्थ्यांत बळावली व ते खवळले. दुसऱ्या दिवशी, तीन मेला कॉलेज आवारात अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांची सभा झाली. सभा संपून विद्यार्थी शांतपणे परतत असतानाच आवारात पोलीस घुसले आणि त्यांनी बडवाबडवीला व धरपकडीला सुरुवात केली आवारात पोलीस बोलविण्याचा निर्णय कॉलेज अधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या सल्ल्याने घेतला होता असे म्हणतात.

तशी फ्रान्सच्या शिक्षणसंस्थांमधून असंतोषाची दारू फार पूर्वीपासून ठासून भरलेली होती. नेपोलियनच्या काळापासून चालत आलेल्या या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा हवी अशी मागणी सतत केली जात होती. इतर पाश्चिमात्य देशांच्या मानाने, फ्रान्समधल्या फारच कमी विद्यार्थीसंख्येला पदवीपरीक्षेपर्यंत शिक्षण घेण्याची संधी लाभत होती. परीक्षा फार कडक घेतल्या जात. संस्थेच्या मानाने प्राध्यापक कमी, जागा कमी, अभ्यासक्रम जुनापुराणा, सरकारची जाचक बंधने, नोकरशाहीचा वरचश्मा अशा अनेक तक्रारी होत्या. विद्यार्थ्यांचा विकास साधणारी ही ज्ञानमंदिरे नसून त्यांची मने मारणारे हे कैदखाने आहेत अशी टीका सर्रास होत होती. या दारूच्या कोठारावर ठिणगी पडण्याचाच काय तो अवकाश होता, ते पेट घेणार हे उघड होते. ही ठिणगी तीन मे या दिवशी पडली आणि धडाड्धुमला सर्वत्र सुरुवात झाली. संघटना नाही, निश्चित योजना नाहीत, प्रस्थापित डाव्या-उजव्या कोणत्याच नेतृत्वाचा पाठिंबा नाही-तरी डॅनी दि रेडचा आगलावा पंथ आता चोहीकडे भराभर

। ८२ ।