पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे. अन्नाची तर प्रथमच. वीस वर्षे आपण परदेशातून अन्न आणतो ही केवढी लाज आणणारी गोष्ट आहे ! आणि म्हणे हा देश शेतीप्रधान आहे. एके काळी सुवर्णभूमी म्हणून या देशाचा लौकिक होता ! पुन्हा हा लौकिक प्रस्थापित करणे शक्य आहे. निर्धाराची, थोड्या आत्मविश्वासाची फक्त निकड आहे'–असा काही तरी मी केलेला शेवट होता. नक्की व सुसंगत आज इतक्या दिवसांनंतर काही आठवत नाही.

तसे नक्की आणि संगतवार असे या सभेचे, दिवसाचे काहीच आठवत नाही. आठवते ते इतकेच की, दिवस फार चांगला गेला, सभा खूप रंगली. रात्रीही गाढ शांतता वाटली. माणसे किती छान वागली ! वेशीवर पाच पन्नास माणूस तरी सकाळी घ्यायला जमला होता. उतरण्याची सोय शाळेत होती. जागा किती स्वच्छ सारवून ठेवली होती ! पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी दोन वेगवेगळ्या, घासूनपुसून चकचकीत केलेल्या पितळी पिंपात ठेवलेले इथे प्रथमच आढळले. जेवायची वेळ चुकली नाही, जेवताना अवाजवी आग्रह झाला नाही. विश्रांतीच्या वेळात कोणी येऊन बोलत बसले नाही. धुळवडीचा हा दिवस होता. संध्याकाळ मुलांचे खेळ पाहण्यात गेली. खेळ संपल्यावर सभा. तीच मंडळी सभेसाठी येऊन बसली. वोनतीन सरकारी अधिकारी सभेसाठी मुद्दाम आलेले होते. एका फळ्यावर हिंदुस्थानचा नकाशा काढून त्यावर ' वेरूळ ते मुंबई' हा अन्नसंचलनाचा मार्ग खडूने रेखित केलेला होता. कसलाही औपचारिकपणा सभेत दिसत नव्हता, तरीही एक अदब होती, शिस्त होती. स्वागताची भाषणे नाहीत, आभाराची लांबड नाही. सारे कसे रेखीवपणे चालू होते.

सभा संपल्यावर तीन मैलांवर असलेल्या सभापतींच्या गावी जाऊन त्यांच्याकडे जेवून आलो. सगळ्यांना वाटत होते या चांदण्यात लहानशी सहल काढावी. शेजारच्या टेकडीवर चढून जावे, लांबवर पसरलेल्या रस्त्याच्या काळ्या मातीत पडून रहावे, नाचावे, सूर लावावेत ! मला मात्र स्वस्थ, एकट्याने उघडयावर कुठे तरी बसून रहावेसेच फक्त वाटत होते. कारण एकान्तात गेल्याशिवाय हे समाधानाचे कढ मला आवरता येणार नव्हते.

तसे काहीच नवीन घडले नव्हते; पण ही झुळझुळणारी प्रसन्नता, ही सळसळणारी शांतता आज नवीन होती. इथे व्याकुळता होती; पण दुःख नव्हते. ओढ होती, आतुरता होती; पण अस्वस्थता नव्हती. एक रुखरुख मात्र जाणवून गेली. आपण कवी असायला हवे होते ! ही अवस्था आपल्याला शब्दात साठवून ठेवता यायला हवी होती...


एप्रील १९६८

*

। ७८ ।