पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेल्होळी : जि. नासिक


एखादी मैफल रंगावी तशी वेल्होळीची सभा रंगली. कुठल्याही, कुणाच्याही अभिप्रायाची अशा वेळी गरज नसते. आपले आपल्यालाच कळत असते, जाणवत असते की, आज जम बसतो आहे, मेळ साधतो आहे, रंग भरतो आहे.

तरी पण 'आज सभा छानच झाली' असे सभा संपल्यावर मोकाशी म्हणाले तेव्हा सर्वांनाच समाधानाच्या दुधात साखर पडल्यासारखे वाटले. कारण आजवर पाचपन्नास सभा मोकाशींनी ऐकलेल्या होत्या. रोज तेच तेच विचार ऐकण्याचा त्यांनाही कंटाळा येणे स्वाभाविक होते. आम्हालाही कधीकधी येतच होता-नवीन असे सांगितले जाण्याची शक्यता कमी होती.

पण त्या दिवशी सुरुवातच नव्या पट्टीत, नव्या लकेरीने झाली. आजवर आमचा परिपाठ असा. आपण परदेशांकडून अन्न-मदत घेत राहिल्याने आपली ‘ पत' कशा घसरली आहे, अनेकदा मानहानी कशी पत्करावी लागली आहे हे राजाभाऊ कुलकर्णी यांनी प्रास्ताविकादाखल सांगायचे. यामुळे आम्ही राजाभाऊंना किंवा त्यांचा भूमिका पार पाडणाऱ्या प्राथमिक परिचयवक्त्याला ' पतवाले' म्हणत असू.

यानंतर आमचे जोशीबुवा सरसावत. ते सर्वोदयी कार्यकर्ते. शेतीची. खतांची बरीच माहिती त्यांच्याजवळ तयार. 'आपली गेलेली पत परत मिळवायची असेल तर परदेशांवर अवलंबून रहाण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे. आपल्या आसपास जी नैसगिक संपत्ती वाया जात आहे तिचा आपण कटाक्षाने वापर केला पाहिजे.' अशी प्रस्तावना करून ते 'खते' या विषयावर बरीच माहिती शेतकऱ्यांना सांगत. सोनखत, शेणखत, हिराखत इत्यादी खतांचे प्रकार, ते जमा करण्याची पद्धता वगैरे त्यांनी सांगितलेले ज्ञान बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्सुकतेने ग्रहण केले, तुरळक ठिकाणी त्यावर चर्चाही झाल्या. शिवाय जोशीबुवांच्या सांगण्यात एक प्रकारचा ठाशीवपणा असे, त्याचाही परिणाम होई. अमुक अमुक पद्धतीने खत गोळा करा, शेतात टाका. उत्पन्न इतके वाढेल. आम्ही प्रयोग करून पाहिले आहेत. नाही उत्पन्न वाढले तर मला विचारा. जोशीबुवांचे 'हे मला विचारा' इतक्यांदा होई

। ७४ ।