पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. प्रवास थोडा जिकिरीचा आहे, सावकाशीचा आहे. हरकत नाही. हेच तर आपले म्हणणे आहे- सावकाश चालू, पण स्वतःच्या बळावर चालू. थोडा वेळ जास्त लागला तरी काही बिघडणार नाही. दुसऱ्याचा आधार सोडला पाहिजे. फार काळ तो घेतला. आता घेतला तर कायमचे पांगळे राहू. ज्यांनी आधार दिला त्यांचे आभार मानू. यापुढे जे देऊ करतील त्यांना साभार नकार देऊ. म्हणू, ‘आमचे आम्ही पाहून घेऊ. धन्यवाद!'

वाटेत होळीचा दिवस येईल. करू पुन्हा एकदा परदेशी वस्तूंची होळी. निदान त्या दूधभुकट्यांची नाही तर अमेरिकन गव्हाची तरी ! सगळ्यांनी आले पाहिजे!

आणि २९ मार्चला मुक्काम मुंबई. वर्षप्रतिपदेला-नव्या वर्षाच्या नव्या दिवशी नव्या गुढ्या उभारू, नवे संकल्प उच्चारू.त्या अथांग दर्यात आपलीही स्वतंत्र अस्तित्वाची नाव निर्भयपणे लोटून देऊ. त्या वेळी आपल्या सर्वांच्या मुखात असतील 'कोलंबसाची गर्वगीते;' आपल्या अंतःकरणातील स्फूर्ती असेल 'वंदे मातरम् वंदे मातरम्...... '

या गर्वगीतांच्या आणि स्फूर्तीमंत्रांच्या सामगायनासाठी,
मित्रांनो ! चला
कैलास ते सिंधूसागर
एक-दोन, एक-दोन, एक-दोन, एक...
संचलन सुरू होत आहे.
स्वयंचलनाचे पहिले पाऊन उचलले जात आहे.
श्री कै ला स ते सिं धू सा ग र...


डिसेंबर १९६७

। ७३ ।