पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गरजेपेक्षा तेव्हा पाच टक्के अन्नधान्य देशात कमी होते. भाव वाढले असते, गरीब वर्गात कदाचित् असंतोष फैलावला असता या भीतीने तूट भरून काढण्याचा हा आडमार्ग तेव्हा स्वीकारण्यात आला. सरळ मार्ग हा होता की, एकतर गरज कमी करणे किंवा उत्पादन वाढविणे; परंतु यासाठी शेतीव्यवस्थेच्या संपूर्ण पुनर्घटनेची जोखीम पत्करावी लागली असती. ही आव्हाने कोण स्वीकारतो ? त्यापेक्षा आयातीचा बिनधोक मार्ग सोयीस्कर. पुढे या मार्गाची इतकी सवय झाली की, इकडे समस्या उद्भवली की, झोळी मोठी पसरायची, इतकेच काम राज्यकर्त्यांना शिल्लक उरले. कधी वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरायचे, कधी चीन-पाकिस्तान युद्धाची निमित्ते सांगायची ; काहीच नसेल तर निसर्गाची अवकृपा आहेच. उत्पादन वाढले तरी तूट कायमच; त्या वेळी पाच टक्के होती, आता ती दहा टक्क्यांवर आली. यंदा तर पीकपाणी भरघोस आहे. आपल्या मानेवर बसलेला हा भिकेचा समंध उठवण्याची ही नामी संधी आहे. तरीही आम्ही अमेरिकेकडे पंचाहत्तर लाख टन अन्नधान्याची मागणी केलीच आहे. अमेरिका यातली निम्मी मागणी पूर्ण करणार आहे. प्रांतबंदी उठवलीत तर यापेक्षा अधिक भीक वाढू असे अमेरिकेकडून सूचित केले गेले असल्याची वार्ता आहे. आपल्या अंतर्गत कारभारात इतका उघडउघड हस्तक्षेप करून, आमच्या उरल्या-सुरल्या प्रतिष्ठेचे अमेरिकेने अगदीच धिंडवडे काढू नयेत म्हणून मूळ पंचाहत्तर लाख टनांची मागणी साठ लाख टनांपर्यंत खाली आणण्याची केंद्रीय अन्नमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे असेही कळते.

विवेकभ्रष्टांचा शतमुखांनी अधःपात होत असतो तो असा.

या प्रकारच्या नियोजनाला आता सुटी दिलीच पाहिजे. आमचे मनुष्यबळ, आमची साधनसामग्री गतिमान करणारे, स्वावलंबनाच्या पायाशुद्ध आधारावर उभे असलेले स्वदेशी संयोजन आपल्याला हवे आहे. गरिबी निश्चित वाईट आहे व ती हटवली पाहिजे याविषयी दुमत नाही; पण रक्त, अश्रू आणि घाम याशिवाय गरिबी हटविण्याचा दुसरा पर्याय अद्याप कुणाला कुठेही सापडलेला नाही, हे आपण आता लोकांना आणि सरकारलाही हडसूनखडसून सांगितले पाहिजे. भांडवलशाही देश आर्थिक प्रलोभनाने हे कार्य साधतात, साम्यवादी देश हुकुमशाहीच्या बळावर श्रमशक्ती जागृत करतात. आपला अर्धवट समाजवाद यापैकी काहीच करू शकत नाही. श्रमाच्या काटेरी मार्गाऐवजी भिकेचा आरामी आणि हरामी मार्ग आपण पत्करला ; स्वाभिमान विकला, सोय पाहिली. परिणाम झाला देशाच्या पुरुषार्थशक्तीवरच. आपणच नाही, दोनतृतियांश गरीब जग या सोयिस्कर पळवाटेने श्रीमंत होण्यासाठी बेभान धावत आहे. कदाचित् काही दिवस, यापैकी काहींना श्रीमती लाभेलही; पण त्यांच्या हातून पुरुषार्थ कधीही घडणार नाही. कारण

। ७१ ।