दारिद्र्याशी समोरासमोर झुंज घ्यावी, त्यासाठी अवश्य असणारे ज्ञानविज्ञान, यंत्रतंत्र येथे जन्माला घालावे, येथली शक्तीबुद्धी आणि नैसर्गिक साधनसामग्री यांचा काही मेळ साधावा, घासूनपुसून, वेळप्रसंगी पणाला लावून येथले स्वाभाविक सामर्थ्य वाढवावे, येथली प्रतिभा जागी करावी, खुलवावी, विस्तारावी आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तिचा लौकिक नेऊन भिडवावा ही जिद्दच येथे नाहीशी झाली. आयते तंत्र आयात करून झटपट गबर होण्यात येथील कारखानदारांना भूषण वाटू लागले, आयते अन्न आणून येथील दुष्काळ आणि उपासमार थांबवण्यात येथील राज्यकर्त्यांना कसलाही कमीपणा वाटेनासा झाला. आडमार्गाने दुसऱ्याच्या ज्ञानावर व श्रमावर डल्ला मारून झटपट सुखी व श्रीमंत होण्याची स्वप्ने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांनाच पडू लागली. श्रम नाहीत, साहस नाही. आयते जगण्याजेवणाची चीड नाही. पौरुषाचा ऱ्हास अटळ होता आणि आता तर तो सर्वत्र अगदी गृहीतच धरला जातो.
परवाची घटना.'भारतीय साहित्या'वर व्याख्याने देण्यासाठी नुकतेच एक बंगाली विद्वान-लोकनाथ भट्टाचार्य-फ्रान्समध्ये गेले होते. पॅरिसमधल्या त्यांच्या व्याख्यानाच्या शेवटी अठरा वर्षांच्या एका तरुणाने (पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवणा-या एका शास्त्रज्ञाचा तो नातू होता) नम्रपणे विचारले,'आपले धान्यही न उत्पादणा-या देशास कल्पना-विचार-साहित्य प्रांतात म्हणण्यासारखं काही निर्मिता येईल असं तुम्हास खरंच वाटतं ?'
बंगाली बाबूंचे रवींद्रपुराण तिथेच संपले.
सर्वच क्षेत्रातील आमचे परावलंबन वाढविणारे कसले हे नियोजन ! पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अन्नधान्याव्यतिरिक्त आपण दीडशे कोटी रुपयांची परकीय मदत घेतली. दुस-या योजनेसाठी नऊशे कोटी रुपये उचलले. तिसरीच्या कालखंडात आकडा गेला दोन हजार कोटींच्या घरात. चवथी, परकीय मदत किती मिळणार हे नक्की कळल्यावाचून सुरूच होऊ शकत नाही ही अवस्था ! मागच्या योजनेत खरेदी केलेली यंत्रसामग्री दुरुस्त राखण्यासाठी पुढच्या योजनेतील नवीन तरतुदी आणि त्यासाठी पुन्हा नवीन परकीय मदत, असे हे न थांबणारे चक्र आहे.गेल्या दहा वर्षांत देशात प्रस्थापित झालेल्या मूलभूत उद्योगधंद्यांपैकी बहुतेक सर्व उद्योगधंदे अजूनही त्यांच्या उत्पादनाच्या २५ ते ५० टक्केपर्यंत परदेशी आयातीवर अवलंबून आहेत. हे देशाचे औद्योगीकरण की परदेशीकरण ?
शेतीची व अन्नधान्याची कहाणी तर यापेक्षाही लाजिरवाणी. कृत्रिमरीत्या देशातील अन्नधान्याचे भाव खाली ठेवून समृद्धीची व वैपुल्याची खोटी व फसवी भावना देशात निर्माण करण्यासाठी ही परकीय अन्नमदत घेण्याची क्लृप्ती निघाली.