पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षणासाठी आपली मुले लहानपणापासून पाठवून त्यांना कायमचे गुलाम बनविण्यास उत्सुक असलेला, रहाणीमान वाढविण्याच्या आदर्शामुळे झपाटून जाऊन कोणतीही बौद्धिक प्रतारणा करण्यास संकोच न बाळगणारा, परदेशप्रवासात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा, परकीय मदतीवर येथल्या विकासाचा डोलारा उभा करून देश स्वयंपूर्ण करू पहाण्याच्या अज्ञानाला अर्थशास्त्र समजणारा, श्रीमंत देशांनी आपली पकड आणि वर्चस्व कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या अनेक सांस्कृतिक देवाणघेवाणींच्या कार्यक्रमात स्वतःस गुंतवून, गुरफटवून घेऊन 'मानवी स्वातंत्र्या'वर भरल्यापोटी प्रवचने झोडणारा, भ्रष्ट आणि चारित्र्यशून्य राजकर्त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या स्तुतिसुमनांनी वर्तमानपत्रांचे स्तंभच्या स्तंभ भरून काढणारा आजचा सुशिक्षितांतील बहुसंख्य वर्ग आणि इंग्रजी राज्यापुढे वाकलेला पेशवाईतील ब्राह्मणवर्ग यात फरक कसा करावा ते समजत नाही. फारतर पोशाख बदलले एवढे म्हणता येईल; पण वाकण्याची, झुकण्याची, गुडघे टेकण्याची, दिपून जाण्याची, तात्कालिक सुखलाभ पाहण्याची वृत्ती तीच आहे. हिटलरच्या आक्रमणापुढे नेपालियनचा फ्रान्स दोन आठवड्यात प्रतिकाराचा एक आवाज न उठवता लोळण घेतो याचे लास्कीने दिलेले कारण फ्रेंच सुशिक्षित वर्गाची सुखासीनता आणि नैतिक अधःपात, हे आहे. लोकसत्तेच्या, जनतेच्या शक्तीच्या कितीही गप्पा मारल्या तरी सामाजिक, सांस्कृतिक पुरुषार्थाची जबाबदारी विशिष्ट शक्तीने व बुद्धीने युक्त असलेल्या निवडक वर्गाला पार पाडावी लागते असा इतिहास आहे. ही जबाबदारी सकळिकांसाठी, अखिलांसाठी-त्यातल्या त्यात जे रंजले-गांजलेले असतील त्यांच्या उद्धारासाठी--स्वीकारणे एवढीच पुरोगामित्वाची जन्मखूण असते. म्हणून 'बुद्धिस्तु भा गानमम' असे चाणक्य म्हणतो. हा आपल्या स्वतंत्र बुद्धीचा प्रत्यय, अभिमान, ताठपणा ही तर सुशिक्षितांची खास मिरासदारी ! वेळ पडल्यास निष्कांचन होऊनही ती पेलली पाहिजे, मिरवली पाहिजे. प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या आजच्या सुशिक्षित वर्गात असे प्रत्ययाचे पौरुष प्रकट करणारे मिरासदार किती सापडतील ?

चैत्राच्या अलिकडचा मास. तीथ असावी अष्टमी किवा नवमी. चंद्र थांबला होता आणि · बिलोरी रजताने रात्र शिंपडली जात होती.' निळावंती प्रसन्न होती, आकाशाचा सौधतल तारकांनी खचून गेला होता. किती युगे उलटली, व्याधाला अजून आपला नेम साधता येत नव्हता, अरुंधतीला सप्तर्षीच्या समीप जाता येत नव्हतं. आकाशगंगा फेसाळून वहात होती आणि तिच्या तीरावर सुरु असलेली ध्रुवाची तपश्चर्या अजून संपलेली नव्हती. अथांग रुपेरी दर्या, संथ उभी असलेली चंद्रनौका आणि मी! एकटा, मस्त, धुंद !

| ६० |