पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालावे व उद्यासाठी दोन-तीन भाकरी बरोबर द्याव्यात म्हणून मी दिलेले सूचक उत्तर.

‘रात्री जेवा आणि पडा. मी येतोच जरा खालून' असे म्हणून मालक जो सायकल घेऊन गेला तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला दिसलाच नाही.

दुसऱ्या खोपटाचा मालक आला. आल्याआल्या बायकोवर तडकला. नंतर माझी विचारपूस. बायकोला पातळ भाकरी, पिठले टाकण्याचा हुकुम. अंड्याची पोळी वगैरे चालेल का?' म्हणून मला विचारणा. मी पहिल्याच मालकाकडे जेवणार आहे हे सांगितल्यावर हा आग्रह थांबला. या मालकाच्या खोपटाबाहेर पलंग होता. तो स्वच्छ करण्यात आला. आतून गादी-उशी आणून त्यावर टाकण्यात आली. पांघरूण मात्र मला घेववेना. थंडीत काकडणे मी अधिक पसंत केले.

पहिल्या मालकाकडे जेवायला बसलो. यात्रेला निघालेल्याला असा भाकरतुकडा खाऊ घालावा. पुण्य लागतं !'

पहिला घासच तोंडात फिरला. पाण्याबरोबर मी तो कसाबसा गिळला आणि उठलोच.

आवराआवर करून पलंगावर अंग टाकले. दुसऱ्या मालकाने उशाशी ट्रान्झिस्टर आणून ठेवला.

मी चक्रावून गेलो. कडब्याच्या पेंड्या उभ्या करून, वर ताडपत्री टाकून कसेबसे उभे केलेले खोपटे आणि त्यात ट्रान्झिस्टर ?

या मालकाची दोन-अडीच एकर शेती आणि दुधाचा धंदा होता. पाणी मिसळून रोज दोन-तीन रुपये तर आम्ही कमावतोच,' अशी मघाशीच त्याने फुशारकी मारली होती. महिन्याभरावर सोसायटीच्या निवडणुका आल्या होत्या. यात उभे राहून हजार-पंधराशे रुपये खर्च करण्याची याची तयारी होती. ‘पडलो तरी वरच्या लोकांशी संबंध येतो, कामे होतात,' असा निवडणुकांमागचा साधा हिशोब होता. इतका पैसा हाती असताना हा असा खोपटात का राहतो ? याच्या मुलांच्या, बायकोच्या अंगावरचे कपडे इतके फाटके का ? चहा घेतला ते पहिले खोपट यापेक्षा जरा बरे होते. त्या मालकाची बागायती जमीन ८-१० एकरांची होती. ऊस लावणारा हा शेतकरी गुळाचा चहा का पितो ? घरात सायकल आहे, धाकट्या भावाच्या हातात घड्याळ आहे, भाऊ पाच मैलावरच्या गावातील शाळेत शिकतो आहे. तरी पण घर असे का ? शिक्षणाचा, आर्थिक सुबत्तेचा प्रभाव घरा-दारावर, वागण्या-बोलण्यावर का नाही ? हा विकास आहे की केवळ उचल ? सांस्कृतिक प्रबोधनाशिवाय होणारी ही शैक्षणिक व आर्थिक वाढ समाजाला वर नेऊ शकेल

| ५७ |