पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निदान वाटेवरची एखादी बऱ्यापैकी वस्ती तरी ! नाही. एकदमच हातपाय गळाले. जिवाची तगमग सुरू झाली. असे एकदमच त्राण का जावे ? ऊन बाधले का ? ज्या वेळात घरी आपण आरामात वर्तमानपत्रे वाचीत लोळत पडायचे त्या वेळी आपण भर ऊन्हातून चालत राहिलो हे चुकले का ? कुणास ठाऊक. आपल्याकडे यावर गोळी वगैरे काही नाही, औषध नाही. थांबले पाहिजे. जेमतेम रस्त्याच्या कडेला लागलो. बांध ओलांडून पलीकडे शेतात जाणेही अशक्य झाले. दिले उंचवट्यावरच अंग झोकून. एवढेच पाहिले की, हाकेच्या अंतरावर एक-दोन माणसे शेतात काम करताहेत, पलीकडे दोन खोपटी आहेत, विहीरही असावी. रात्र काढायचीच झाली तर अगदीच चिटपाखरांच्या संगतीत नको.

लोळणच घ्यावी लागावी एवढी उलघाल झाली होती ! आठवले. राजगडावरचा आचार्य भागवतांचा शेतीप्रयोग पहायला गेलो होतो तेव्हा ऊन्हाने असाच कलमललो होतो. कोलमडलो होतो. खरोखर भागवतांच्या प्रयोगाचा अधिक विचार आणि विस्तार का होत नाही ? त्यांना संपूर्ण वेड्यात काढणारे जाणकार मला भेटलेले आहेत, त्यांना लाभलेली तज्ज्ञांची प्रशस्तीही मी पाहिलेली आहे. पावसाचे पाणी वाहू जाऊ न देता जमिनीत मुरवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे हा जर भागवतांच्या प्रयोगाचा मुख्य आशय असेल तर त्यावर अधिक संशोधन का होऊ नये ? बर्वे समितीचा अहवाल सांगतो की, आहे ते पाण्याचे सर्व साठे उपयोगात आणले तरी महाराष्ट्रातील फक्त तेवीस टक्के जमिनीला पाणीपुरवठा होऊ शकेल. म्हणजे आपला मुख्य प्रश्न कोरडवाहू शेती पिकवणे हाच आहे. धरणे, कालवे यांच्यामुळे होते आहे असे की, ८० टक्के कोरडवाहू शेतीत काहीच प्रगती नाही आणि ऊसाच्या, तंबाखूच्या व इतर नगदी पिकांच्या बागायती मात्र विषमतेची साक्ष पटवीत अधून मधून वर येतात ! कोरडवाहू दुर्लक्षितच राहते. आणि हा कोरडवाहूचा मुख्य प्रश्न पावसाच्या पाण्यालाच साठवून, मुरवून ठेवण्याच्या चळवळी हाती घेतल्याशिवाय अन्य कशाने सुटेल असे वाटत नाही. बांधबंदिस्ती, वृक्षारोपण या चळवळी सुटीत विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांच्या मदतीने हाती घेण्यास खूप वाव आहे. एरवी गाव उदासीन असते. पण अशी बाहेरून कुमक आली, ताजे विचार आले, नव्या प्रेरणा आल्या तर गावकऱ्यांची साथही मिळते, असा बहुतेक ठिकाणचा अनुभव आहे. सरकारी यंत्रणा नेमकी येथेच अपुरी पडते. योजना चांगल्या असतात, अधिकारीही कित्येकदा प्रामाणिक असतात. पण सारा व्यवहार निर्जीव असतो. गावाचे मन प्रथम तयार करण्याचे, आपलेसे करण्याचे महत्त्व पटलेले नसते, पटले तरी सरकारी चाकोरीतून तसा प्रयत्न करण्यास फारसा वावही नसतो. म्हणून कित्येकदा असे वाटते की, हे काम आता खाजगी संस्थांनी, वजनदार व्यक्तींनी हौस आणि गरज म्हणूनही हाती का घेऊ नये ? सरकारने अवश्य ते सर्व

| ५३ |