पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्या मातीच्या जागरणासाठी सर्वांचा आज एवढा आटापिटा सुरू आहे, निदान असला पाहिजे, तिचा प्रत्यक्ष स्पर्श, अंगसंग इतका खुपणारा, रुतणारा असावा ? जिला माता म्हणून एवढया भक्तिभावाने वंदिले जाते ती वास्तवात एवढी कडवट, एवढी जाडीभरडी वाटावी ? हिला मातृत्व केव्हा व कसे प्राप्त झाले ? सर्वच मानवांना, सर्व कालात ही सारखीच पवित्र वाटत आली आहे काय ? आज इथे तर उद्या तिथे भटकणाऱ्या लमाणांच्या तांड्यांना जमीन ही ‘काळी आई' वाटते का ? आदिवासी समाजाची जमिनीकडे पहाण्याची भावना वेगळीच असते असे त्या समाजाचा विशेष अभ्यास केलेले लोक सांगतात. का मानवी समाज भटक्या टोळ्यांच्या अवस्थेतून शेतीवाडीच्या अवस्थेत उत्क्रांत झाल्यानंतरच भूमी ही त्याला देवतास्वरूप भासू लागते आणि कृषिसंस्कृतीच्या अस्तानंतर ही भावना लोप पावते ? उद्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अवश्य ते अन्नपाणी समुद्रातून किंवा केवळ वातावरणातूनच मनुष्यमात्राला उपलब्ध होऊ शकले किंवा अन्य काही मार्गाने भुकेचा परिहार झाला तर आज जसे आकाशाकडे आपण पाहातो, तसेच जमिनीकडेही पाहू लागू काय ? वेदातला ऋषी म्हणतो, 'माता भूमी, पुत्रोऽहं पृथिव्या '_' भूमी माझी माता आहे, मी तिचा पुत्र आहे.' आपण 'वंदे मातरम्' म्हणतो. पण आपल्या केवळ पादस्पर्शाने ती अवमानित होईल, दुखावेल, म्हणून वेदातील ऋषी प्रातःकाळी उठल्याउठल्याच क्षमस्व मे ! क्षमस्व मे ! म्हणून जिला विनम्रभावे वंदन करतो ती माता पृथ्वी आणि रिपुदलसंहारार्थ जिला आपण सभासभातून आवाहन करतो ती सुजला, सुफला, माता भारती–मातृत्वकल्पना समान असली तरी आशय किती भिन्न आहे ! प्राचीन काळची ती विशाल कल्पना आधुनिक काळात अशा लहान रूपात का प्रकट व्हावी ? ही सगुणरूपे लहानमोठी का होतात, का बदलत असतात ?

प्रहर उलटला होता. उठावेसे वाटत नव्हते पण उठणे भाग होते. कितीही वेग घेतला असता तरी तीस मैलांचे सकाळी ठरवलेले उद्दिष्ट यापुढे गाठणे शक्य नव्हते. निदान वीस मैलांवरचे ठिकाण तरी गाठावे म्हणून चाल सुरू केली होती; पण वेग हळू हळू मंदावतच होता. ठणका वाढत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचे कुतूहलही सकाळपेक्षा वाढले होते, कारण पोशाखात आणखीनच क्रांती घडली होती. डोक्यावर उन्हाळी टोपी चढली होती. डोळ्यांवर गॉगल होता, बुशकोट निघाला होता-कुणी हौशी अमेरिकन टीनएजर ! रंग फक्त खास भारतीय ! माझा खिसा चांगलाच गरम असणार या कल्पनेने एक इसम चहासाठी पैसे मागून मागून दमला: पण मला काही पाझर फुटला नाही. शेवटी त्याची सहानुभूती जागी झाली व ' निर्वासित का ? कुठून निघालात ?' अशी त्यानेच मला पृच्छा केली. मी 'हो' म्हटले आणि ब्याद कटवली. वेग आणखीनच मंदावला. वीस मैलांचा मुक्कामही दूरचा वाटू लागला.

| ५२ |