पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून आपल्या हालचालीत, प्रयत्नात एक व्यापक सुसंगती निर्माण करणारी, आपल्याला तळापासून वर उचलणारी एखादी जाणीव, एखादे सूत्र, एखादा आधार या पदयात्रेमुळे प्राप्त झाला नाही तर ! तर हा आटापिटा, श्रम वायाच जाणार. नुसती पायपीट होणार. यात्रा निष्फळच ठरणार.

वास्तविक सगळे सुरळित पार पडत गेले असते तर या वेळी मला असे पंधरा-वीस दिवस घराबाहेर काढताही आले नसते. सुप्याच्या 'माणूस प्रतिष्ठान'च्या विहिरीचा उद्घाटन सोहळा याच सुमारास केव्हातरी करण्याचे ठरत होते. पाडवा म्हणा, शिवजयंती म्हणा. पण विहिरीचे काम ठराविक मुदतीत पुरेच होऊ शकले नाही. दिवाळीच्या पाडव्याला कामाला सुरुवात झाली. दोन महिने काम अगदी नेटाने झाले. नाताळाच्या सुटीत विद्यार्थ्यांचा श्रमसप्ताहाचा कार्यक्रम योजला, तोही अपेक्षेपेक्षा जास्तच यशस्वी ठरला. पण पुढे कामाचा वेग मंदावला. कारणे दोन : एक सुरुवातीस लागलेले पाणी बरेचसे आटले व नवीन झरेही लागले नाहीत. त्यामुळे कामावरच्या मजुरांचा, जमिनीच्या मालकमंडळींचा उत्साहही थोडा ओसरला. दोन : शेतीचा हंगाम सुरू झाल्यामुळे विहिरीवर काम करणाऱ्या संचाची पांगापांग झाली. बाहेर अधिक रोजगार मिळत असल्याने माणसे मिळेनाशी झाली. हे काम । ठेकेदाराला देऊन व्याप व त्रास वाचवावा असे सुरुवातीपासूनच अनुभवी लोकांचे म्हणणे होते. पण केवळ विहिर खणून देणे एवढाच ‘प्रतिष्ठान'च्या कार्यामागचा उद्देश नव्हता. अन्नोत्पादन वाढीला हातभार लावण्याबरोबरच छोटा शेतकरी व शेतमजूर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध यावा, त्यांच्या स्थितीचे आकलन व्हावे, त्यामुळे ग्रामीण जनतेचा व शहरी सुशिक्षितांचा श्रमाचा व बुद्धीचा तुटलेला दुवाही जोडण्यास मदत व्हावी असे अनेक उद्देश या प्रकल्पामागे होते. नाहीतर विद्यार्थ्यांचे तसे महाग ठरलेले शिबिर योजण्याचे काय कारण होते ? विद्यार्थी हौसेने आले, तळमळीने आले, त्यांनी कामही उत्तम केले. पण त्यांच्या येण्याजाण्याचा खर्चच कामाच्या किमतीपेक्षा जास्त होणार, हे उघड दिसत असूनही हा कार्यक्रम योजला, तो, वरील सामाजिक उद्देश डोळ्यांसमोर होते म्हणूनच. हा श्रमसप्ताहाचा कार्यक्रम पूर्ण यशस्वी ठरला याचा एक पुरावा म्हणजे कार्यक्रम संपल्यावर विहिरीवर काम करणाऱ्या अडाणी मजुरांनाही चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. काही दिवस करमेनासे झाले आणि विद्यार्थ्यांनीही कबुली दिली, ‘काम थ्रिलिंग होते. सुप्याला काहीतरी नवीन पहायला, अनुभवायला मिळाले.'

विहिरीचे काम ठरल्याप्रमाणे पूर्ण झाले असते तर या उन्हाळी सुटीत एखादा वेगळा कार्यक्रम सुपे भागात पुन्हा योजलाही असता; पण वरच्या दोन अडचणींच्या जोडीला

| ४८ |