पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्याचा शोध की सुंदरतेचे ध्यान ?

हा शोध तरी कसा घ्यायचा ?

हे ध्यान तरी कसे करायचे ?

वाट कुणाला पुसायची ?

थकला आहेस ! छेः तसे काही नाही. सकाळपासून चार तास अखंड, एकटा चाललास म्हणून कंटाळला आहेस ! कबूल. स्वाभाविक आहे कंटाळा येणं. कुठेही तोचतोचपणा आला की कंटाळाही येतोच. पण थोडी कळ काढलीस तर ही महानगराची हद्द आता संपतच आली आहे. ती एकदा ओलांड आणि मग कुठेही सावलीखाली थांब. विश्रांतीची तुला गरज आहे. विश्रांतीला तू आता पात्रही आहेस.

महानगरसीमा. शेकडो वेळा गाडीने, मोटारने या मार्गाने पूर्वी प्रवास केला होता. पण याच वेळी या सीमारेषेवर मन असे रेंगाळल्यासारखे का करते आहे ? पायाखालून काहीतरी सुटते आहे, आपण कशाला तरी अंतरतो आहोत, अशी शंका आताच का वाटू लागली ? यापुढचा मार्ग एकट्याचा, बराचसा अनिश्चित. काही प्रमाणात धोक्याचा, म्हणून ही भीती तर उभी राहिली नाही ! पण निदान आजतरी भीतीचे कारण नव्हते. एकवेळची शिदोरी बरोबर घेतलेली आहे. पुढच्या वाटेवर बऱ्यापैकी १-२ हॉटेल्स आहेत आणि रात्रीचा मुक्काम तीस मैलांवर असलेल्या एका ओळखीच्या पेट्रोलपंपावर करायचा हे सकाळी निघताना ठरलेले आहे. धोका, अनिश्चितता आणि त्यातून उद्भवलेली काळजी असली तर ती उद्यापासून वाटायला पाहिजे. आताचा हा थरकांप काही वेगळाच आहे. का सुरक्षित दिनक्रमात बदल होणार ही जाणीव या क्षणी तीव्रतेने झाल्यामुळे आपण अस्वस्थ झालो ? नाही. दिनक्रम बदलेल, बदलावा म्हणून तर आपण मुद्दाम हा वेगळा प्रवास योजला. ही अवस्था अधिक सूक्ष्म दिसते. हातचे काहीतरी सुटत असल्याची, पण पळते दृष्टिपथातही आले नसल्याची ही वेदना असावी ? तसे हातचे पूर्ण सुटतही नव्हते. कारण पंधरा-वीस दिवसात, फार तर महिनाभरात मी परतणार होतो. प्रवास जेवढा जमेल, झेपेल, आवडेल तेवढाच पायी होता. शरीराचे अकारण हाल करून घेण्याची मुळीच तयारी नव्हती. पण वीस वर्षे अंगवळणी पडलेली चाकोरी आचारविचारांचा साचा थोडा बदलता आला तर पहावा, प्रयत्नांना काही स्वतंत्र नवी दिशा, वेगळा अर्थ आणि आशय प्राप्त करून देता आल्यास पहावे, हा या पदयात्र मागे जरूर उद्देश होता. निदान तशी प्रेरणा होती. ही प्रेरणा अपुरी राहिली, उद्देश असफल झाला तर ! आपली विघटना थांबवणारी, आपल्या साऱ्या शक्ती केन्द्रीभूत

| ४७ |