पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओरिसात १४०० ग्रामदाने मिळूनही हे आंदोलन का फसले याची सविस्तर चर्चा मी त्या वेळी लिहिलेल्या 'ग्रामदानाची प्रयोगभूमी' या पुस्तकात केली होती. या पुस्तकाचे त्यावेळी खूप स्वागतही झाले. डॉ. धनंजयराव गाडगीळांनी सोळापानी प्रदीर्घ प्रस्तावना लिहून या पुस्तकाच्या यशाला मौलिक हातभार लावला. तर पां. वा. गाडगीळांनी दोन स्वतंत्र अग्रलेख लिहून या पुस्तकाचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसवले. अग्रलेखातील पहिलेच वाक्य असे होते- 'अवघ्या शंभर पानांचे हे पुस्तक असूनही हा एक मराठीतील श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ ठरावा एवढी याची योग्यता आहे हे सुरुवातीसच आम्ही सांगून ठेवतो.' अर्थात ही अतिशयोक्ती होती हे उघड आहे. कारण पुस्तकाची योग्यता मी मनोमन जाणून होतो. पण स्तुती कोणाला आवडत नाही ! डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी कळविले होते, 'निबंध उत्कृष्ट झाला आहे. माहिती जमा करण्याची कसोशी, अवलोकन, त्यातून निष्कर्ष काढण्याची बुद्धी–सर्वच गुण यात दिसून येतात. पण याहीपेक्षा स्वतंत्रपणे चिंतन करण्याचे जे सामर्थ्य या लेखात दिसून येते ते विशेष अभिनंदनीय आहे. मला निबंध वाचून अत्यंत आनंद झाला. यातील ‘स्वतंत्र' या शब्दाचा मलाही अत्यंत अभिमान वाटला होता, हे नाकारण्यात काय अर्थ आहे ? 'मौज' ने आठदहा स्तंभ लिहून या पुस्तकाचा परामर्ष घेतला होता, प्रा. ठाकुरदास बंग यांनीही 'साधने'त दोन-तीन लेख तेव्हा या पुस्तकासंबंधी लिहिल्याचे अंधुकसे आठवते. ‘टाईम्स ऑफ इंडिया' मध्ये या एका मराठी पुस्तकावर कॉलमभर परीक्षण यावे याचे तर माझ्यासकट सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता, इतका काळ उलटल्यानंतर हे त्या वेळेचे पुस्तकाचे स्वागत आठवून वृत्तपत्रीय प्रसिद्धीची क्षणिकता तीव्रतेने जाणवते. आणि या क्षेत्रातच आपण गेली दहा वर्षे रमलो ! अजूनही रमत आहोत !

तसे सगळेच क्षणिक असते म्हणा ! तरीही सापेक्षतेने जे चिरंतन आहे असे वाटते त्याचे रहस्य कशात असते ? काळ कोणती अक्षरे विसरतो आणि कोणती जवळ बाळगतो !

काळालाही प्रवाहाच्या मर्यादेतच रहावे लागते.

ज्याला मर्यादा नाही, जे अनंत आहे, अतीत आहे, मुक्त आहे, त्याचा काही सुगंध ज्यांना लाभतो, तीच शब्दपुष्पे काळ आपल्या लाटांवर आनंदाने मिरवीत नेतो काय ?

का त्याचेच संगीत जो गातो, तेच सूर आणि तेच शब्द तो जतन करतो ! ज्ञानेश्वरांचा 'परस्पर्श' की गोंविदाचा पावा ?

अतीताची ओढ की आत्मगानाची आवड ?

| ४९ |