Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




पोचमपल्लीकडे


लांबवरूनच दहाचे टोल ऐकू येत होते. बाजूच्या स्टेशनात गाडी धडधडत शिरत होती. बहुधा सिकंदराबाद एक्सप्रेस. याच गाडीने मी दहा वर्षांपूर्वी ओरिसातील ग्रामदान पहाणीचा माझा दौरा संपवला होता. आताही मी याच चळवळीच्या उगमस्थानाकडे-गंगोत्रीकडे निघालो होतो. 'पहाणी' हा मात्र आता उद्देश नाही. कारण तिथे काय आढळेल याची पूर्वानुभवामुळे स्थूल कल्पना होतीच. आज मी यात्रिक होतो आणि यात्रेकरूने का कुठे काही ‘पहायला' जायचे असते ! त्याने जायचे असते ते भावसमृद्धीसाठी, दृढतेसाठी-जे पहायचे असते ते त्याचेपाशीच असते. भूदानग्रामदान चळवळीमागील मला समजलेला, जाणवलेला भाग 'अंत्योदया' चा आहे. समाजातील अखेरच्या, तळच्या माणसाला स्पर्श करावा, तो वर उचलावा ही या आंदोलनामागील नैतिक प्रेरणा मला भिडते व अविरोधाच्या, सर्वात्मकतेच्या भूमिकेवरून करण्यात आलेली या आंदोलनाची मांडणी माझ्या भारतीय मनाला जवळची वाटते. अखेरच्या माणसाला जाग यावी ही या काळाचीच प्रेरणा आहे. हा आजचा युगविशेष आहे. जो विचार, जे आंदोलन, जो पक्ष, जे राजकारण या प्रेरणेतून उगम पावत नाही, या युगविशेषावर आधारित नाही ते आधुनिक नव्हेच. त्याची नैतिकताही सदैव शंकित आणि शबलित रहाणार आहे. कम्युनिझम (समाजवाद यात आलाच) हा या प्रेरणेचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तो प्रभावी ठरतो. पुरोगामित्वाच्या नावाखाली कम्युनिझमने भीषण हत्याकांड घडविली असतील, वंचनेची आणि विश्वासघाताची महापापे केली असतील. महापापे फॅसिझमही करतो, कम्युनिझमही करतो. पण कम्युनिझमच्या मुळाशी आधुनिक युगाची, समतेची तलस्पर्शी प्रेरणा जागी असते, फॅसिझमच्या मुळाशी ती नसते, एवढाच काय तो मौलिक, मूलभूत फरक. त्यामुळे इतिहास लेनिनला युगनेता मानतो, क्रांतीचा उद्गाता म्हणून गौरवतो, हिटलरला भस्मासुर ठरवतो. पण हत्याकांडांचा, हिंसेचा, रक्तरंजित संघर्षाचा हा कम्युनिझमचा वारसा टाळून अखेरच्या माणसाला भारतात न्याय मिळवून देता येतो का ! भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या मुळाशी ही भूमिका होती असे मला वाटते.

| ४५ |