पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समतोलाचा अभाव

३ : फैजपूरला कॉलेज निघाले. एका दृष्टीने ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ज्या ओढगस्तीने व घिसाडघाईने हे कॉलेज निघत आहे ती प्रवृत्ती अंतिमदृष्ट्या समाजाला घातकच आहे. फैजपूरमधील शाळेला आज चाळीस वर्षे उलटून गेली; परंतु शाळेला स्वतःची इमारत नाही; चार ठिकाणी भाड्याच्या जागा घेऊन शाळा भरवावी लागत आहे. प्राथमिक शाळांची स्थिती याहूनही शोचनीय आहे. ओल असणाऱ्या जमिनीवर मुले बसत आहेत; अंधाऱ्या खोल्यातून वर्ग चालू आहेत. एका टोकाला शिक्षणाची ही दुर्दशा तर दुसऱ्या टोकाला कॉलेज सुरू करण्याची उतावीळ, हा काय समतोल विकासाचा आदर्श आहे ? मुख्यमंत्री श्री. चव्हाण कॉलेजचे उद्घाटन करावयास आले असता त्यांना ही परिस्थिती कोणी समजावून दिली नाही. कोणीही त्यांना 'प्राथमिक शाळा पहायला चला' असे सांगितले नाही या निमित्ताने विकासातील विषमता त्यांच्या नजरेसमोर आणता आली असती लोकांनाही आपल्या प्रयत्नातील विसंगती उमगली असती व सर्वांचाच नियोजनविषयक दृष्टिकोन सुधारण्यास मदत झाली असती; पण यापैकी काहीही फैजपूरात घडल्याचे ऐकिवात नाही.

सत्ताधारी काँग्रेसपक्ष आत्मसंतुष्ट आणि विरोधी राजकीय पक्ष अल्पसंतुष्ट ही आहे चालू परिस्थितीतील खरी कोंडी. या दोन्हीही आघाड्या निवडणुका आल्या की, जाग्या होतात आणि पुन्हा दीर्घकाळ सर्वत्र सामसूम असते. लोकशक्तीच्या नित्य उपासनेचे महत्त्व कोणीही ध्यानात घेत नाही. या उपासनेला प्रारंभ केल्याशिवाय जनशक्ती जागृत होईल हे संभवनीय नाही. ही उपासना कुणी काशीविश्वेश्वराच्या महाद्वारात घंटानादाच्या सहाय्याने करावी. तर कुणी फैजपूरसारख्या लहान गावातील एखाद्या राऊळात एकांताने करावी. खरे सामर्थ्य उपासकात आहे, असे उपासक गावोगाव निर्माण होण्याची आज गरज आहे. या उपासकांमागे पैशाचे, पक्षांचे, स्थानांचे पाठबळ असो वा नसो, तो जेथे आपले कार्य सुरू करील तेथे या सर्व गोष्टी उपस्थित होतील. निर्झरांनी आपले प्रवाह स्वच्छंद खळखळत ठेवावेत; त्यांना नदीचे दर्शन घेता येईल. नद्यांची महानदी आणि महानद्यांचा महासागर निर्माण करण्याचे कार्य निसर्ग करीतच आहे. त्याची चिंता कशाला ?

ऑगस्ट १९६१

। ३६ ।