पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोळस सहकार अवश्य

फैजपुरातच या दृष्टीने काम करण्यास आज भरपूर वाव आहे. येथील विणकर समाज, शेतमजूर, गरीब जमीनमालक किंवा कुळे यांच्या संघटना तयार करून त्यामार्फत या समाजघटकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न होणे जरूर आहे. पंचवार्षिक योजना किंवा इतर कायदेकानू यामुळ प्राप्त होणाऱ्या हक्कांची या समाजाला जाणीव देणे, जे जे लाभ घेता येतील ते ते घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हे काम जबाबदार विरोधी राजकीय पक्षाने करावयास हवे. या सहकार्यामुळे जनता सरकारी पक्षाच्या आहारी जाईल ही भीती व्यर्थ आहे. प्रत्यक्ष काम करीत असलेला पक्ष टाकून पैशाचे वाटप करणाऱ्या पक्षाला मते देण्याइतकी जनता केव्हाही खुळी नसते. आज तसा पक्षच डोळ्यासमोर नसल्याने जनता हवालदिल होऊन कोणाच्याही पेटीत मते टाकीत असते. त्यात जनतेचा दोष नसून राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली आजची पोकळीच याला जबाबदार आहे. योजनेच्या व कायदेकानूंच्या कार्यवाहीशी अशा पद्धतीने डोळस सहकार्य केल्याशिवाय त्यांच्यातील नेमक्या उणीवाही ध्यानात येणे कठीण आहे. सहकार्य करीत असताना कायदेशीर तरतुदी जेथे अपूर्ण वाटतील तेथे कायद्यात सुधारणा घडवून आणण्याचे बाहेरचे लोकशाहीप्रणीत मार्ग खुले आहेतच. अशा परिस्थितीत संघर्षाचा किंवा झगडण्याचा प्रसंग जरी उद्भवला तरी त्यामुळे विरोधी पक्षाचे सामर्थ्य कमी होण्याऐवजी उलट वाढीस लागलेलेच आपणास दिसून येईल. लोकजागृतीतही अशा संघर्षामुळे निश्चित भरच पडेल. आज विरोधी पक्षांतर्फे लोकमत जिंकण्यासाठी होणारे झगडे हे अनेकदा शुद्ध राजकीय ‘स्टंट' स् असतात. वास्तवाशी संबंध सुटला की, ‘स्टंट' स् सुचू लागतात व त्याने ना पक्षाचे बळ वाढते ना लोकांचे औदासिन्य दूर होते. परिस्थितीच्या अपरिहार्यतेतून निष्पन्न होणारा झगडाच समाजाचे पाऊल पुढे नेणारा ठरतो. त्यासाठी परिस्थितीचे योग्य आकलन जरुर आहे. या सम्यक् आकलनासाठीच योग्य त्या प्रमाणात चालू सरकार, सरकारतर्फे सुरू असणाऱ्या भिन्नभिन्न योजना यांच्याशी डोळस सहकारी संबंध असणे अगत्याचे आहे.

नित्यकार्याचा अभाव

फैजपुरात हे कार्य आज कोणताही पक्ष पद्धतशीरपणे करीत नाही. समाजवादी पक्षातर्फे गेल्या वर्षात चालू परिस्थितीच्या विवरणासाठी दोन जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या. एक बांबु कामगार सोसायटी या पक्षातर्फे स्थापन झालेली आहे. एक दवाखानाही या पक्षाची मंडळी चालवीत असतात; परंतु नित्य राजकीय कार्याचे भांडवल पक्षाजवळ नाही. जनसंघाची चौकशी करता असे समजले

। ३४ ।