पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिवेशन यशस्वी झाले ते काँग्रेसच्या त्या वेळच्या पुरोगामी व क्रांतिकारक स्वरूपामुळेच; विरोधकांनी फैजपूरचे ‘फजितपूर ' करण्याचा डाव मांडला होता. परंतु फैजपूरमधील हीच गोरगरीब जनता काँग्रेसमागे निश्चयाने उभी राहिली म्हणून फैजपूरचे ‘फजितपूर' होण्याऐवजी ‘फत्तेपूर' झाले. स्वातंत्र्योत्तर काळात वास्तविक हीच जनता काँग्रेसच्या सेनेत दिसावयास हवी होती. परंतु प्रकार उलटाच झाला. त्यावेळचे कट्टर प्रतिगामी विरोधक आज ‘बहुजनसमाज' या नावाने, जातीय भावनांचा आधार घेऊन आर्थिक व राजकीय सत्तेची सर्व सुखे मनमुराद उपभोगीत आहेत आणि स्वातंत्र्यासाठी कष्टलेली गोरगरीब बहुसंख्य जनता मात्र स्वातंत्र्याच्या फलितांपासून, गेल्या तेरा वर्षांतील विकासकार्याच्या लाभांपासून वंचित राहिलेली आहे.

सहकारी संस्थांचा अनुभव

ग्रामीण क्षेत्रासाठी आपण गेल्या तेरा वर्षात केलेल्या सर्व पुरोगामी कायद्यांचा व सुधारणांचा लाभ या संकुचित वृत्तीच्या अल्पसंख्य गटालाच प्राधान्याने होत गेला आहे. त्यामुळे बहुसंख्य जनता आपल्या आवाहनापासून दूर रहावी, तिने आपल्या कार्यक्रमांना सहकार्य देऊ नये हे स्वाभाविकच आहे. श्रम जनतेचे आणि फळ निवडक ऐतखाऊ गटाचे हे व्यस्त प्रमाण सत्ताधाऱ्यांच्या ध्यानात आले नाही तरी ते जनतेला मनोमन जाणवल्याशिवाय कसे राहील ? कूळकायदा आला तरी हा गट त्यातून कसा सफाईने निसटला हे मागे सांगितलेच आहे. निसटला इतकेच नव्हे, तर 'कुळ' या नात्याने अनेक जमिनी कायदेशीररीत्या गिळंकृत करून या वर्गाने खेड्यापाड्यांत आपले आसन बळकट करून ठेवले. ज्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा कायदा अस्तित्वात आला तो मात्र अधिकच कंगाल बनून उघड्यावर पडला. स्वातंत्र्योत्तर काळात आपण सहकारी सोसायट्यांचा विस्तार केला; परंतु या विस्ताराचा लाभ तरी कोण घेऊ शकत आहे? जेवढी जमीन जास्त तेवढे सोसायटीकडून कर्ज जास्त; जिरायतदारापेक्षा बागायतदाराला कर्ज अधिक. आता जास्त जमीन धारण करणारा बागायतदार शेतकरी आपल्याकडे कोण व त्याचे समाजातील एकूण प्रमाण किती ? फैजपुरात जमिनीच्या खातेदारांची एकूण संख्या सुमारे सहाशेच्या घरात आहे. को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभासदसंख्या मात्र फक्त १४३ आहे. केवळ एकचतुर्थांश शेतकऱ्यांनाच सहकारी सोसायटीच्या सेवासुविधांचा लाभ घेता येण्याजोगी परिस्थिती आहे. या १४३ शेतकऱ्यांपैकीही आज प्रत्यक्ष कर्जदार शेतकऱ्यांची संख्या केवळ ७४ एवढीच आहे ! या वर्षी वाटलेले एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज व कर्जदार शेतकऱ्यांची ७४ ही संख्या याचे अधिक विश्लेषण केले तर केवळ धनिक शेतकरीच या सोसायटीचा फायदा कसा घेऊ शकतो हे सहज सिद्ध होईल. उत्तर प्रदेशातील काही खेड्यांच्या समाजशास्त्रीय

। ३० ।