पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बहुजनसमाज' कोण ?

फैजपूरच्या खऱ्या बहुजनसमाजाचे जीवनदर्शन हे असे आहे. तेरा हजार लोकसंख्येपैकी जवळजवळ आठ-नऊ हजार लोक या अवस्थेत जीवन कंठीत आहेत. गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला दोन-तीनशे रुपयांपेक्षा जास्त नाही आणि विणकराच्या पदरात तीस-चाळीस रुपयांपेक्षा महिन्याकाठी अधिक मजुरी नाही. गेल्या तेरा वर्षात दोन पंचवार्षिक योजना पार पडल्या, परंतु फैजपुरातील या बहुसंख्य जनतेपर्यंत या योजनांचा एकही पाट वहात आला नाही. जनतेच्य विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांपासून जनता मात्र दूरच राहिली वास्तविक याच गोरगरीब जनतेच्या पाठिंब्यावर १९३६ साली काँग्रेसचे अधिवेशन यशस्वी होऊ शकले होते. परकीय ब्रिटिश सरकारचा रोष व छळ सोसूनही आपल्या दोन-दोन, चार-चार एकर जमिनींचे तुकडे अधिवेशनाच्या मंडपासाठी देण्यास हीच गोरगरीब माणसे त्यावेळी पुढे सरसावली होती. त्यांच्या त्यागातून आणि देशभक्तीतून फळास आलेल्या स्वातंत्र्याची फळे त्यांच्याच पदरात पडू नयेत हा केवढा विस्मयजनक प्रकार आहे ?

याहीपेक्षा विपरीत प्रकार असा आहे की, १९३६ साली जी अल्पसंख्य प्रतिगामी मंडळी केवळ आपल्या संकुचित स्वार्थापोटी काँग्रेसच्या त्या वेळच्या ऐतिहासिक अधिवेशनास विरोध करण्यास धजावली होती तीच मंडळी स्वातंत्र्योत्तर काळात येथे प्रबल सत्ताधारी बनून सामाजिक व आर्थिक विकासाला अडथळा उत्पन्न करीत आहेत. फैजपूर नगरपालिका त्या काळी या प्रतिगामी वर्गाच्याच ताब्यात होती. शेजारील सावदा गावात याच वर्गाचे प्राबल्य होते. काँग्रेस अधिवेशनाला, बहुजनसमाजापर्यंत पोहोचणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याला या प्रतिगाम्यांचा एवढा विरोध की, खुद्द पंडित नेहरूंची अध्यक्षीय मिरवणूक त्यावेळी सावदा गावातून येऊ शकली नव्हती; सावदा गावाच्या बाहेरून निराळा नवीन मार्ग तयार करून मिरवणूक अधिवेशनाच्या जागेपर्यंत आणावी लागली होती. शेवटी शेवटी तर चक्क जातीय भावनांना चेतवून या प्रतिगामी वर्गाने काँग्रेसविरुद्ध लोकमत कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता. केवढी मातबर माणसे या विरोधी वर्गात सामील होती याची कल्पना त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या पत्रकांवरून सहज येऊ शकते. (नमुन्यादाखल एक पत्रक लेखाच्या शेवटी दिले आहे ते पहावे.)

दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात हाच सर्व वर्ग काँग्रेसमध्ये सत्ताधारी झाला आणि जनतेचा आवाज उठविण्याची काँग्रेसची पूर्वीची शक्ती क्षीण झाली. १९३६ साली आर्थिक व जातीय सत्ता ज्यांच्या हातात पूर्ण केंद्रित झाली होती तो हा प्रतिगामी गट व परकीय ब्रिटिश सत्ता या उभयतांच्या संघटित विरोधावर मात करून काँग्रेस

। २९ ।